हिमोफिलियाच्या रुग्णाचा पाय कापून वाचविला जीव; मेडिकलच्या सर्जरी विभागाचे यश
By सुमेध वाघमार | Updated: April 18, 2025 18:46 IST2025-04-18T18:46:05+5:302025-04-18T18:46:58+5:30
Nagpur : डागाने उपलब्ध करून दिले ‘फॅक्टर ९’च्या ५० कुप्या

A hemophiliac patient's leg was amputated to save his life; a success for the surgery department of the medical college
सुमेध वाघमारे
नागपूर : शरीरांतर्गत किंवा बाह्य भागात जखम झाल्यास काही जणांचे रक्त सतत वाहत रहाते. त्यात ‘क्लोटिंग’ होत नाही. या समस्येला ‘जेनेटिक डिसआॅर्डर हिमोफिलिया’ असे म्हणतात. अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे किचकट व गुंतागुंतीचे असते. मात्र, मेडिकलच्या शल्यचिकित्सा (सर्जरी) विभागातील डॉक्टरांनी आपला अनुभव व कौशल्याच्या बळावर हिमोफिलिया आजाराच्या १६ वर्षीय मुलाचा खराब झालेला पाय कापून त्याचा जीव वाचविला. यात डागा रुग्णालयातील हेमोफेलिया युनिटने फॅक्टर ९ च्या ५० कुप्या (वायल्स) उपलब्ध करून सहकार्य केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी भागातील १६ वर्षीय अजित शेंडे याला ९ फेब्रुवारी रोजी मेडिकलच्या सर्जरी विभागातील वॉर्ड क्र. २०मध्ये दाखल करण्यात आले. २० दिवसांपूर्वी या रुग्णाचा उजवा पाय दुचाकीच्या सायलेन्सरमुळे भाजला होता. परंतु त्यानंतर भाजलेली जखम बरीच होत नव्हती. त्यामुळे पाय काळा पडत चालला होता. सातत्याने रक्तस्त्रावही होत होता. वैद्यकीय तपासणीत रुग्णाला हिमोफिलिया असल्याचे निदान झाले. असा रुग्ण १० लाखात एक आढळतो. रुग्ण मेडिकलला येण्यापूर्वी वर्धा येथील सेवाग्राम रूग्णालयात तीन दिवस उपचार घेतले होते. तेथून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. ‘एम्स’ने या रुग्णाला मेडिकलमध्ये पाठविले.
डॉक्टरांनी जोखमीची शस्त्रक्रिया केली यशस्वी
सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. ब्रिजेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रवीण भिंगारे आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांच्या चमूने रुग्णावर तातडीने उपचारास सुरूवात केली. रुग्णाचे प्राण वाचविण्याकरिता उजवा पाय तातडीने कापणे गरजेचे होते. ही शस्त्रक्रिया किचकट आणि गुंतागुंतीची होती. रक्तस्त्राव थांबविण्याकरिता ‘फॅक्टर ९’ही औषधी देऊन जोखमीची ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यात ‘एम्स’मधील रक्तविकारतज्ञ डॉ. विश्वदीप यांच्यासह मेडिकलचे डॉ. अनुप वाकोडकर, डॉ. प्रदीप शिवसारण, डॉ. पंकज टोंगसे, डॉ. महिमा अद्वैत्या, डॉ. रेवती पूल्लावर, डॉ. शिवलीला होसांगडी, डॉ.सिद्धी छजेड, डॉ.प्रणाली पटले, डॉ. युहेश कन्ना, पॅथॉलॉजिस्ट डॉ. शैलेंद्र जांभुळकर, डॉ. मंजिरी माकडे, डॉ. तृप्ती लाडे, डॉ.संदीप पोराटकर, इन्चार्ज सिस्टर आशा मोडक, परिचारिका प्रतिमा उईके व ब्रदर सांगोडे यांनी सहकार्य केले.
डागा रुग्णालय आले धावून
डागा रुग्णालयातील हेमोफिलिया सेंटरमधून हिमोफिलियाच्या रुग्णाला फॅक्टर ९ मोफत उपलब्ध करून दिले जाते. अजित शेंडे या रुग्णाला हे फॅक्टर उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी तातडीने या सेंटरचे युनिट इन्चार्ज डॉ. संजय देशमुख व नागपूरचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.निवृती राठोड यांच्याशी संपर्कसाधला. त्यांनी फॅक्टर ९ या औषधांची ५० कुपी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया होऊ शकली.