नागझिरा अभयारण्यात पाेहाेचला जंगली हत्तींचा समूह; छत्तीसगडमधून गडचिरोली ते गोंदियाचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 10:35 AM2022-09-29T10:35:25+5:302022-09-29T10:38:05+5:30

वनविभागाची बारीक नजर

A herd of wild elephants reached in Nagzira Sanctuary Traveling from Chhattisgarh to Gadchiroli to Gondia | नागझिरा अभयारण्यात पाेहाेचला जंगली हत्तींचा समूह; छत्तीसगडमधून गडचिरोली ते गोंदियाचा प्रवास

नागझिरा अभयारण्यात पाेहाेचला जंगली हत्तींचा समूह; छत्तीसगडमधून गडचिरोली ते गोंदियाचा प्रवास

googlenewsNext

संजय रानडे

नागपूर : छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या वन्यहत्तींच्या कळपाने आता नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे आपला मोर्चा वळवला आहे. सध्या गोंदिया वनविभागातील अर्जुनी मोरगाव येथे २३ हत्तींचा कळप पाेहाेचला असून त्यांच्या हालचालींवर वनविभागाकडून बारीक नजर ठेवली जात आहे.

गाेंदियाचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना गडचिराेली जिल्ह्यातून निघालेला हत्तींचा समूह काही दिवसांपूर्वी गाेंदिया जिल्ह्यात पाेहाेचल्याची माहिती दिली. सध्या माेरगाव रेंजमध्ये त्यांच्या हालचाली दिसून येत आहेत. मात्र, या कळपाने अद्याप राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ पार केला नसून एनएच- ६ च्या दक्षिणेकडे नवेगाव राष्ट्रीय उद्यानाजवळ हा कळप थांबला आहे. मानव- वन्यजीव संघर्षाचे कारण ठरू नये म्हणून वनविभागाचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या स्ट्रिप्स आणि ग्रीन अर्थ फाउंडेशनचे यामध्ये सहकार्य मिळत असल्याचे ते म्हणाले.

१८०० ईसापूर्वीचा ऐतिहासिक मार्ग

एनजीओचे साग्निक सेनगुप्ता यांनी सांगितले, छत्तीसगडहून हत्तींच्या कळपाने १३ ऑगस्ट राेजी गडचिराेली जिल्ह्यात प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी वाघभूमी गावात त्यांनी तीन घरांचे नुकसान केले. वनविभागाच्या मालेवाडा रेंजमध्ये १२ दिवस मुक्काम केल्यानंतर त्यांनी देलनवाडी व कुरखेडा रेंजमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वडसा रेंजमार्गे २४ सप्टेंबर राेजी कळपाने गाेंदिया वनविभागाच्या गाेठनगाव रेंजमध्ये प्रवेश केला. त्यांचे मार्गक्रमण नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे हाेत आहे. या भागात १८०० ईसापूर्वी हत्तींचे अस्तित्व हाेते. त्यामुळे हा ऐतिहासिक मार्ग असल्याचे सेनगुप्ता यांनी स्पष्ट केले. सध्या ड्राेन कॅमेराने हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कळपाचा संभाव्य मार्ग

२६ सप्टेंबरला दुपारी १.३० वाजता अर्जुनी माेरगाव रेंजच्या प्रतापगड पर्वतरांगामध्ये हत्तींच्या कळपाचे पहिले दर्शन झाले हाेते. ते नवेगाव राष्ट्रीय उद्यानाकडे तीन संभाव्य मार्गाने पाेहाेचू शकतील, अशी शक्यता डिसीएफ कुलराज सिंह यांनी व्यक्त केली. वनविभागाच्या सर्व रेंजच्या अधिकाऱ्यांद्वारे या कळपावर नजर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- बुटाइ- खैरी- सुकळी- बाराभाटी- कवठा- एरंडी

- प्रतापगड, गाेठनगाव- तिबेट कॅम्प- चिचाेली- दिनकरनगर

- काळीमाती- डाेंगरगाव- काेहळगाव- जब्बारखेडा- धाबेपवनी

Web Title: A herd of wild elephants reached in Nagzira Sanctuary Traveling from Chhattisgarh to Gadchiroli to Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.