नायलॉन मांजामुळे कापला मजुराचा गळा; लागले ५० टाके
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 11:18 AM2023-01-28T11:18:29+5:302023-01-28T11:19:14+5:30
वेळीच उपचार मिळाल्याने जीव वाचला; नारा भागातील घटना
नागपूर : गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जरीपटका येथील नारा घाट पुलाजवळ बाइकवरून जात असलेल्या मजुराचा मांजामुळे गळा कापल्याने ५० टाके लागले. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील रहिवासी रुमेंद्र बट्टुजी रहांगडाले हा नागपुरात सेंट्रिंगचे काम करतो. तो गुरुवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यासोबत बाइकने जरीपटका बाजारात मोजमापासाठी टेप घेण्यासाठी जात होता. रुमेंद्र बाइक चालवित होता. नारा घाट पुलाजवळ अचानक मांजामुळे त्याचा गळा कापला गेला. यामुळे त्याचे बाइकवरील नियंत्रण सुटल्याने तो खाली पडला. गस्तीवरील जरीपटका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गोरख कुंभार व त्यांचे सहकारी तात्काळ मदतीला धावले. त्यांनी रुमेंद्रला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
वेळीच उपचार मिळाल्याने रुमेंद्र याचा जीव वाचला. मकर संक्रांतीनंतर पोलिस कारवाई थंड पडली आहे. नायलॉन मांजामुळे मागील काही दिवसात जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जरीपटका येथील एका मुलाला जीव गमवावा लागला. मकर संक्रांतीनंतर प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर शहरात पतंगबाजी झाली. यासाठी प्रामुख्याने नायलॉन मांजाचा वापर करण्यात आला. जरीपटका पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.