कळमन्यात सापडला मोठा शस्त्रसाठा; पिस्तूल, देशी कट्टे, धारदार शस्त्रे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:57 AM2023-06-24T11:57:19+5:302023-06-24T11:59:00+5:30

युवकास अटक : घरगुती वादातून भंडाफोड

A large stockpile of weapons found in Kalmana; Pistols, country knives, sharp weapons seized, man arrested | कळमन्यात सापडला मोठा शस्त्रसाठा; पिस्तूल, देशी कट्टे, धारदार शस्त्रे जप्त

कळमन्यात सापडला मोठा शस्त्रसाठा; पिस्तूल, देशी कट्टे, धारदार शस्त्रे जप्त

googlenewsNext

नागपूर : खासगी कंपनीत फिटरचे काम करणाऱ्या युवक आपल्या घरात पिस्तूल आणि देशी कट्टा तयार करण्याचा कारखाना चालवीत होता. घरगुती वादाच्या एका प्रकरणाच्या तपासात कळमना पोलिसांनी या कारखान्याचा भंडाफोड करून आरोपी युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून देशी पिस्तूल, तीन कट्टे, १३ काडतुसांसह मोठा शस्त्रसाठी जप्त केला आहे. या कारवाईमुळे पोलिसात एकच खळबळ उडाली आहे.

रमाकांत रघुनाथ धुर्वे (वय २७, रा. वैष्णोदेवीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रमाकांतने आयटीआयमधून फिटरचा कोर्स पूर्ण केला आहे. तो खासगी कंपनीत काम करतो. त्याच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी आणि दोन भाऊ आहेत. सर्व जण एकाच घरात वेगवेगळे राहतात. रमाकांतचा आपल्या भावांशी घरगुती वाद सुरू होता. गुरुवारीही त्यांच्यात वाद झाला. रमाकांतची पत्नी आणि आई भावाची तक्रार देण्यासाठी कळमना ठाण्यात गेल्या.

पोलिसांनी घरगुती वाद असल्यामुळे रमाकांतलाही बोलावण्यास सांगितले. पोलिसांनी सातत्याने बोलावूनही रमाकांत ठाण्यात येण्याचे टाळत होता. पोलिसांनी चौकशी केली असता रमाकांतच्या हालचाली संशयास्पद असल्याचे समजले. पोलिस त्याच्या घरी पोहोचले. पोलिसांना पाहून रमाकांत पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी पाठलाग करून त्यास पकडले. त्याने पळून जाण्याचे कारण सांगितले नाही.

कळमनाचे ठाणेदार देवेश ठाकूर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची सूचना दिली. त्यांनी अतिरिक्त पोलिस बळ मागवून रमाकांतच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरात सज्जावर लपवून ठेवलेला शस्त्रांचा साठा पोलिसांना आढळला. ते पाहून पोलिसांच्या पायाखालील वाळू सरकली. पोलिसांच्या चौकशीत रमाकांतने सांगितले की, तो २०१७ मध्ये रेल्वे रुळाजवळ क्रिकेट खेळत होता. दरम्यान त्याला एक बेवारस पोते सापडले. त्यात शस्त्र होते; परंतु याची सूचना पोलिसांना का दिली नाही, या प्रश्नावर तो काहीच बोलला नाही.

पोलिसांनी शस्त्रसाठी जप्त करून रमाकांतला अटक केली आहे. आयटीआयमधून फिटरचे प्रशिक्षण घेतल्यानंतर रमाकांतचा फॅब्रिकेशनच्या कामात हातखंडा आहे. जप्त केलेले शस्त्र आणि दुसरे साहित्य यावरून रमाकांत घरातच शस्त्र बनविण्याचा कारखाना चालवीत असल्याचे पुढे येत आहे. पोलिसांनी बारूद जप्त केल्यामुळे त्याची पुष्टी झाली. रमाकांत संशयास्पद प्रवृत्तीचा आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याचे कुटुंबीयांशी देखील पटत नाही. यामुळे त्याचे कुटुंबीय त्याची माहिती नसल्याचे सांगत आहेत.

ही शस्त्रे केली जप्त

रमाकांतकडून देशी रिव्हॉल्व्हर, तीन कट्टे, १३ जिवंत काडतुसे, ६ रिकामे काडतूस, एअरगन, १०८ एअरगनचे छर्रे, तीन तलवार, दोन चाकू, भाला, फायटर, बारूद, लोखंड साफ करण्याचा स्प्रे, गॅस भरण्याची रिफील, लोखंड गरम करण्याचे सिलिंडर आणि बॉक्ससह १.३० लाखाचे साहित्य आढळले आहे.

आधीही सापडला कारखाना

नागपूर हे नक्षली चळवळीचे केंद्र राहिले आहे. यापूर्वी काटोल मार्गावर बोरगावमध्ये नक्षलवाद्यांच्या शस्त्राचा कारखाना आढळला होता. नक्षलवाद्यांशिवाय कुख्यात आरोपी शस्त्राचा वापर करतात. या दिशेने रमाकांतचे संबंध आहेत काय, याचा तपास सुरू आहे.

Web Title: A large stockpile of weapons found in Kalmana; Pistols, country knives, sharp weapons seized, man arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.