हातमजुरी करणाऱ्या कामगाराकडून एकाला जीवनदान
By सुमेध वाघमार | Published: November 5, 2023 05:41 PM2023-11-05T17:41:09+5:302023-11-05T17:41:23+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाच्या (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ब्रेन डेड झालेल्या एका तरुणाच्या अवयवाचे दान करण्यात आले.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाच्या (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ब्रेन डेड झालेल्या एका तरुणाच्या अवयवाचे दान करण्यात आले. या दानाने एकाला जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. मेडिकलचे या वर्षातील हे पहिले तर आतापर्यंतचे सातवे ‘रिट्रीव्हल’ म्हणजे अवयवाची पुनर्प्राप्ती होती.
आलोक बुद्धविहार जवळ, जुना बगडगंज येथील रहिवासी राकेश बागडे (४१) त्या अवयवदात्याचे नाव. राकेश बागडे हे हातमुजर होते. काही दिवसांपूर्वी एका घराच्या बांधकामात मजुरीचे काम करीत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते दुसºया माळ्यावरून खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नातेवाईकांनी लगेच मेडिकलच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. त्यांची प्रकृती न्यूरोलॉजिकलदृष्ट्या खालावत गेली.
डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असताना त्यांचे ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘मेंदू मृत’ झाले. याची तपासणी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. सोमा चाम, डॉ. श्रीकांत कलबगवार आणि डॉ. प्रणाली गुरुकर यांनी केली. ही माहिती, ‘झोनल ट्रान्सप्लांट कोआॅर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात प्र्रत्यारोपण समन्वयक दिनेश मंडपे यांनी त्यांचे यकृत न्यु ईरा हॉस्पिटलमधील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाला दान के ले. तर दोन्ही बुबूळ मेडिकलला दान करण्यात आले. त्यांच्या दोन्ही किडनी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसल्याचे त्याचे दान झाले नाही, अशी माहिती डॉ. कोलते यांनी दिली.
-मेडिकलमध्ये चार वर्षानंतर सातवे ‘रिट्रीव्हल’
मेडिकलमध्ये २०१७ मध्ये पहिले ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून अवयवाची पूर्नप्राप्ती (रिट्रीव्हल) झाली. त्यानंतर २०१८मध्ये दोन तर, २०१९मध्ये तीन आणि २०२३मधील हे पहिले ‘रिट्रीव्हल’ झाले. विशेष म्हणजे, मध्यभारतातील मेडिकलमधील सर्वात मोठ्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अपघातातील जखमी रुग्ण येतात. यात ‘ब्रेन डेड’ रुग्णही असतात. यामुळे भविष्यात ‘रिट्रीव्हल’ वाढून मेडिकलच्या रुग्णांनाही अवयवदान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.