दोन हजाराच्या नोटांची चर्चा भरपूर; पण देवाणघेवाण सुरूच

By मोरेश्वर मानापुरे | Published: May 20, 2023 06:47 PM2023-05-20T18:47:41+5:302023-05-20T18:48:16+5:30

Nagpur News दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी घेतल्यानंतर शनिवारी विविध बाजारपेठांमध्ये या नोटेसंदर्भात व्यापाऱ्यांमध्ये साशंकता नव्हती. नोट बदलीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असल्यामुळे व्यापारी निश्चिंत दिसले.

A lot of talk about two thousand notes; But the exchange continues | दोन हजाराच्या नोटांची चर्चा भरपूर; पण देवाणघेवाण सुरूच

दोन हजाराच्या नोटांची चर्चा भरपूर; पण देवाणघेवाण सुरूच

googlenewsNext

मोरेश्वर मानापुरे 

नागपूर : दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी घेतल्यानंतर शनिवारी विविध बाजारपेठांमध्ये या नोटेसंदर्भात व्यापाऱ्यांमध्ये साशंकता नव्हती. नोट बदलीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असल्यामुळे व्यापारी निश्चिंत दिसले. पेट्रोल पंप, सराफा, किराणा, कळमना व कॉटन मार्केट (भाजीपाला), कापड मार्केट आदींसह अन्यही बाजारपेठांमध्ये २ हजाराच्या नोटाचे चलन सुरू असून पॅनिक नको, असे मत व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.


सराफा बाजारात सोन्याचे दागिने खरेदीसाठी केवायसी आणि पॅन कार्ड बंधनकारक असल्याचे दिसून आले. बऱ्याचा बाजारात ग्राहकांना केवायसीविना खरेदीची मुभा दिसून आली. २ हजाराच्या नोटेचा खरा इफेक्ट २३ मेनंतर दिसेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.


गुरुदेवनगरातील पंपावर केवायसी आवश्यक, वर्धा रोडवर नाही

गुरुदेवनगर, न्यू नंदनवन येथील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक रणजीत मानस म्हणाले, निर्देशानुसार २ हजाराच्या नोटेने पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांच्या आधार कार्डची झेरॉक्स व मोबाईल नंतर घेतो. सकाळपासून २ हजाराच्या नोटेने पेट्रोल भरणारे तीन ग्राहक आलेत. एरवी कुणीही येत नाहीत. वर्धा रोडवर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पारधी ऑटो स्टेशन या पंपावर डिलिव्हरी बॉय म्हणाला, निर्देशानुसार ग्राहकाकडून २ हजाराची नोट घेत आहे. सकाळीपासून या नोटेने पेट्रोल भरणारा ग्राहक आलाच नाही.

५० हजारांपर्यंत केवायसी, २ लाखांपर्यंत पॅन कार्ड बंधनकारक
रिक्स नको म्हणून २ हजाराच्या नोटेने ५० हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडून केवायसी आणि २ लाखांपर्यंत खरेदीवर पॅनकार्डची झेरॉक्स बंधनकारक केली आहे. अशी माहिती असोसिएशनच्या सर्व सदस्यांना दिली आहे. २ हजाराच्या नोटेसंदर्भात सतर्कता बाळगण्यात येत आहे.

राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन.

स्वीकारत आहोत २ हजारांच्या नोटा
गांधीबाग कपडा मार्केटमध्ये ३०० पेक्षा जास्त दुकाने आहेत. काहीच वगळता बहुतांश दुकानदार ग्राहकांकडून २ हजारांच्या नोटा स्वीकारत आहेत. तसे पाहता २ हजाराची नोट चलनात फार कमी दिसते. ग्राहक ऑनलाईन आणि ५०० रुपयांच्या नोटांनीच खरेदी करतात.
अजय मदान, माजी अध्यक्ष, गांधीबाग कपडा मार्केट असोसिएशन.


नागपूर इतवारी किराणा बाजारात २ हजाराच्या नोटांचा स्वीकार

नागपूर इतवारी किराणा बाजाराचे अध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, २ हजाराच्या नोटेचा इफेक्ट पहिल्या दिवशी बाजारपेठेत दिसला नाही. किराणा दुकानदार या नोटा स्विकारत आहेत. या नोटेने खरेदी करणारा एखाद्याच ग्राहक येतो. त्यामुळे विनाझंझट या नोटा स्विकारल्या जात आहेत.

आदिनाथ ट्रेडर्सचे संचालक भंवरलाल जैन म्हणाले, सकाळपासून दोन हजाराच्या नोटेने किराणा मालाची खरेदी करणारे दोन ग्राहक आले. त्यांना माल दिला आणि नोटाही स्वीकारल्या. आधीपेक्षा परिस्थिती कठीण नाही. नोटांसह व्यवसायाकडे लक्ष देणे आमचे कर्तव्य आहे.


किरकोळ भाजी विक्रेत्यांकडे दोन हजारांच्या नोटा नाहीच

कॉटन मार्केट असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून २ हजारांच्या नोटा मार्केटमध्ये पाहिल्या नाहीत. सर्वत्र ५०० रुपयांच्या नोटांची चलन आहे. शनिवारी शेतकऱ्यांचे चुकारे आणि किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांची खरेदी ५०० रुपयांच्या नोटांनी आणि ऑनलाइन झाली.

कळमना युवा सब्जी असोसिएशनचे माजी अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, भाजीपाला बाजारात २ हजाराची नोट क्वचितच दिसते. त्यामुळे ही नोट वितरणातून काढून टाकण्याचा परिणाम व्यापाऱ्यांवर फारसा पडणार नाही आणि पुढेही दिसणार नाही.

बँकेत व्यवहारावर फारसा परिणाम नाही

सीताबर्डी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मशीनद्वारे आणि ऑफलाईन पैसे भरण्याची मुभा आहे. दुपारी २ हजारांच्या नोटा बँकेत भरणारे ग्राहक दिसले नाहीत. शिवाय मशीनमध्ये नोटा सहज स्वीकारल्या जात होता. बँकेच्या मशीनचे सॉफ्टवेअर मुख्य कार्यालयाशी लिंक असल्यामुळे २३ मेपासून फरक दिसून येईल, असे अधिकारी म्हणाले. २ हजाराच्या नोटा बदलवून घेणारे कुणीही आले नाहीत. अशीच स्थिती बँक ऑफ महाराष्ट्रच्या सीताबर्डी शाखेत दिसली.

Web Title: A lot of talk about two thousand notes; But the exchange continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.