"हॅलो, माझ्या घरी बॉम्ब ठेवलाय..."; एका कॉलमुळे पोलिसांची धावपळ
By योगेश पांडे | Published: June 5, 2024 11:05 PM2024-06-05T23:05:25+5:302024-06-05T23:05:32+5:30
पोलिसांनी परिसरात चौकशी केली व संबंधित मोबाईल क्रमांक कुणाचा आहे ते विचारले. त्यावेळी तो पळसगावेचा क्रमांक असल्याची बाब समोर आली.
नागपूर : स्वत:च्या घरी बॉम्ब ठेवला असून त्यामुळे धोका निर्माण झाल्याचा खोटा फोन पोलिसांना करणे एका व्यक्तीला महागात पडले. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूकीच्या निकालाच्या दिवशी असा प्रकार घडल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
गणेश विठ्ठलराव पळसगावे (३९, गोकुळपेठ) असे आरोपीचे नाव आहे. ४ जून रोजी रात्री डायल ११२ वर अज्ञात कॉलरचा फोन आला व त्याने त्याचे निवासस्थान असलेल्या अन्नपूर्णा इमारतीत बॉम्ब असल्याची माहिती दिली. ही माहिती अंबाझरी पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी तेथे पोहोचून त्याला फोन केला असता त्याचा फोन बंद येत होता. बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने तेथे तपासणी करण्यात आली. मात्र काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.
पोलिसांनी परिसरात चौकशी केली व संबंधित मोबाईल क्रमांक कुणाचा आहे ते विचारले. त्यावेळी तो पळसगावेचा क्रमांक असल्याची बाब समोर आली. त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी शोध घेतला असता तो घरात लपलेला आढळला. त्याने सीम कार्ड मोबाईलमधून बाहेर काढले होते. त्याला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेण्यात आले व त्याच्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या फेक कॉलमुळे पोलिसांची उगाच दमछाक झाली.