विवाहित पूर्वप्रेयसीला लग्नाची मागणी, विनयभंग करून पतीला मारण्याची धमकी
By दयानंद पाईकराव | Published: June 17, 2023 04:49 PM2023-06-17T16:49:39+5:302023-06-17T16:53:39+5:30
आरोपीस अटक : सतत फोन, मॅसेज करून बोलण्यासाठी करायचा जबरदस्ती
नागपूर : आधी दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. परंतु प्रेयसीने लग्न करून आपला वेगळा संसार थाटला. तिला एक मुलगा झाला अन् दुसऱ्यांदा ती गर्भवती राहिली. परंतु प्रियकराचे प्रेम काही कमी झाले नाही. त्याने सतत फोन, मॅसेज करून बोलण्यासाठी जबरदस्ती करून प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. प्रेयसी न ऐकल्याने त्याने तिचा विनयभंग करून तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. यामुळे प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी प्रियकराला गजाआड केले.
महेश राजु वानखेडे (वय २३, रा. धंतोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो अविवाहित असून खासगी वाहनचालक आहे. त्याचे वस्तीतच राहणाºया २२ वर्षाच्या दिप्तीवर (बदललेले नाव) प्रेम होते. अनेक दिवस सोबत घालविल्यानंतर अचानक दिप्तीने कुटुंबीयांच्या सांगण्यावरून लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करून दिप्ती पतीसोबत सुखाचा संसार करीत होती. दरम्यान तिला एक मुलगा झाला. आता ती पुन्हा गर्भवती आहे. परंतु महेशच्या मनातील दिप्तीविषयी असलेले प्रेम तिच्या लग्नानंतरही कमी झाले नाही. त्याने २०२२ पासून १५ जून २०२३ पर्यंत सातत्याने दिप्तीला फोन, मॅसेज करून बोलण्यासाठी जबरदस्ती केली. तो तिचा पाठलाग करीत होता.
१५ जूनला सायंकाळी सात वाजता आरोपी प्रियकर महेशने दिप्तीला धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत माझ्या सोबत लग्न कर अशी जबरदस्ती केली. त्याने अश्लील शिविगाळ करून तिला पाहून घेण्याची धमकी देऊन दिप्तीच्या पतीलाही मारण्याची धमकी दिली. आरोपी महेशने अश्लील कृत्य करून दिप्तीचा विनयभंग केला. या प्रकरणी दिप्तीने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली ठाण्याच्या उपनिरीक्षक दिपाली गाठे यांनी आरोपी प्रियकर महेशविरुद्ध कलम ३५४ (ड), २९४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास धंतोली पोलिस करीत आहेत.