मित्रच झाला हैवान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्तीने गर्भपात
By योगेश पांडे | Updated: August 10, 2023 17:47 IST2023-08-10T17:46:24+5:302023-08-10T17:47:33+5:30
जीवे मारण्याचीदेखील धमकी : २१ वर्षीय आरोपीला अटक

मित्रच झाला हैवान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्तीने गर्भपात
नागपूर : मैत्रीमध्ये ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व ती गर्भवती राहिल्यावर जबरदस्तीने गर्भपात करवला. इतकेच नाही तर त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार करत तिला जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
विशाल हनुमंत पिल्लेवान (२१) असे आरोपीचे नाव आहे. त्याची १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळखी होती. मुलीने मित्रत्वाच्या नात्याने त्याच्यावर विश्वास टाकला व त्याच्यासोबत ती फिरायला जात होती. त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला शीतपेय पाजले. त्यात त्याने गुंगीचे औषध मिळविले होते. तिला चक्कर आल्यासारखे वाटल्याने तिला तो गाडीवर बसवून स्वत:च्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने बळजबरीने अत्याचार केला.
काही दिवसांनी मुलगी गर्भवती असल्याचे कळाल्यावर विशालने तिला गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला. मात्र यावरच विशाल थांबला नाही. मुलीने त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला. संतापात त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली व मारहाण केली. त्यानंतर त्याने वारंवार धमक्या देत तिच्यावर अत्याचार केले. त्याने अनेकदा तिचा पाठलागदेखील केला. अखेर मुलीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी विशालविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.