माेबाईल फाेन खिशात आपोआप गरम होऊन पेटला; अवघ्या पाच सेकंदात घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2023 07:49 PM2023-06-27T19:49:56+5:302023-06-27T19:50:36+5:30
Nagpur News तरुणाच्या खिशात असलेला माेबाईल फाेन आपाेआप गरम झाला आणि त्याने खिशातील माेबाईल फाेन काढून लगेच बाहेर टाकताच, त्यातून धूर निघायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्या फाेनचा स्फाेट झाला नाही किंवा तरुणाला कुठलीही दुखापत झाली नाही.
नागपूर : तरुणाच्या खिशात असलेला माेबाईल फाेन आपाेआप गरम झाला आणि त्याने खिशातील माेबाईल फाेन काढून लगेच बाहेर टाकताच, त्यातून धूर निघायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्या फाेनचा स्फाेट झाला नाही किंवा तरुणाला कुठलीही दुखापत झाली नाही. हा प्रकार रामटेक शहरातील महात्मा गांधी चाैकात साेमवारी (दि. २६) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
रोशन केळवदे, रा.आमडी, ता.पारशिवनी हे काही कामानिमित्त साेमवारी रामटेक शहरात आले हाेते. ते रामटेक शहरात असताना त्यांच्या पॅन्टच्या खिशातील माेबाइल फाेन गरम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच खिशातील माेबाइल फाेन काढून राेडलगत जमिनीवर ठेवला. अवघ्या पाच सेकंदात त्या फाेनमधून धूर निघायला सुरुवात झाली.
अलीकडे बहुतांश नागरिक स्मार्ट माेबाइल फाेन वापरत असून, घरातील लहान मुलेही माेठ्या प्रमाणात राेज माेबाइल फाेन हाताळतात. तांत्रिक कारणांमुळे बॅटरी गरम हाेऊन फाेन जळण्याची अथवा त्याचा स्फाेट हाेऊन जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माेबाइल फाेन हाताळणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच स्वत: हाताळताना काळजी घ्यावी. फाेन गरम होत असल्यास तंत्रज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जाणकार व्यक्तींनी केले आहे.
पाणी टाकूनही पूर्णपणे जळाला फाेन
आपण मागील तीन वर्षांपासून रेडमी नाेट-९ हा स्मार्ट माेबाइल फाेन वापरत असून, याच फाेनने पेट घेतल्याची माहिती राेशन केळवदे यांनी दिली. माेबाइल फाेनचा स्फाेट हाेऊ नये, म्हणून त्यातून धूर निघत असतानाच, त्यावर पाणी टाकले व फाेन थंड केला, परंतु त्याचा काहीच उपयाेग झाला नाही, उलट त्यातून धूर निघतच राहिला व फाेन पूर्णपणे जळाला, अशी माहिती राेशन केळवदे यांच्यासह काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.