सेवानिवृत्तीच्या तोंडावर धडकले बदलीचे मेल; मेयो, मेडिकलमधील १९ डॉक्टरांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 11:33 AM2023-08-12T11:33:01+5:302023-08-12T11:33:51+5:30

राज्यातील अनेक डॉक्टर्स, प्राध्यापकांच्या मुदतपूर्व आणि नियमबाह्य बदल्या झाल्याची ओरड

A month and a half before retirement, the doctor was transferred; 19 doctors transferred from Mayo, Medical | सेवानिवृत्तीच्या तोंडावर धडकले बदलीचे मेल; मेयो, मेडिकलमधील १९ डॉक्टरांच्या बदल्या

सेवानिवृत्तीच्या तोंडावर धडकले बदलीचे मेल; मेयो, मेडिकलमधील १९ डॉक्टरांच्या बदल्या

googlenewsNext

नागपूर : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १३ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील शेकडो डॉक्टरांच्या बदल्या केल्याने खळबळ उडाली होती. आता पुन्हा गुरुवारी ७५ डॉक्टरांच्या बदल्यांचे ई-मेल धडकल्याने वैद्यकीय क्षेत्रच ढवळून निघाले आहे. धक्कादायक म्हणजे, सेवानिवृत्तीला दीड महिन्याचा कालावधी असलेल्या डॉक्टरचीही बदली करण्यात आल्याने विभागाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १० ऑगस्ट रोजी राज्यातील मेडिकल कॉलेजमधील विविध विभागांतील तब्बल ७५ डॉक्टरांच्या बदल्या केल्या. यात औषध वैद्यकशास्त्रापासून ते शरीररचनाशास्त्र विभागापर्यंतच्या डॉक्टरांचा समावेश आहे. नागपुरातील काही डॉक्टरांना बदल्यांचे ठिकाण विदर्भ न देता मराठवाड्यातील लातूर, संभाजीनगर, धाराशिव मेडिकल कॉलेज दिले आहे.

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) १२ तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेयो) ७ अशा एकूण १९ डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, बदली आदेशात एकतर्फी कार्यमुक्त करण्याची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी यासाठी स्वतंत्रपणे आदेश काढण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

- सेवानिवृत्तीला दीड महिना, तरी बदली

नागपूर मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. वंदना अग्रवाल यांची बदली अकोला मेडिकल कॉलेज येथे करण्यात आली आहे. डॉ. अग्रवाल जवळपास दीड महिन्यात म्हणजे, ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहे. परंतु त्यांचीही बदली करण्यात आली आहे. नागपूर मेडिकल कॉलेजच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांची बदली गोंदिया मेडिकलमध्ये करण्यात आली आहे. डॉ. गोसावी हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. तर नागपूर मेयोच्या रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. अशोक जाधव यांची बदली पुणे मेडिकल कॉलेज येथे करण्यात आली आहे. डॉ. जाधव यांच्या सेवानिवृत्तीला एक वर्षाचा कालावधी आहे.

- नियमबाह्य बदल्या झाल्याची ओरड

राज्यातील अनेक डॉक्टर्स, प्राध्यापकांच्या मुदतपूर्व आणि नियमबाह्य बदल्या झाल्याची ओरड होत आहे. वृद्ध आईवडील, अनेकांच्या अपत्यांचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून तेही आक्षेपार्ह व नियमबाह्य असल्याचे बदली पीडितांचे म्हणणे आहे. सेवानिवृत्तीपूर्व तीन वर्षे बदली देऊ नये, या नियमालाही हरताळ फासल्याचे बोलले जात आहे.

- कॉलेजमध्ये उडाला गोंधळ

बदल्यांना घेऊन काही डॉक्टरांनी न्यायालयातून स्थगिती आणली आहे. यामुळे बदली झालेले डॉक्टर व स्थगिती मिळालेले डॉक्टर एकाच विभागात काम करीत आहेत. यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे.

Web Title: A month and a half before retirement, the doctor was transferred; 19 doctors transferred from Mayo, Medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.