एक महिना उलटला, सना खानच्या मृतदेहाचे रहस्य अद्याप कायमच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 01:19 PM2023-09-02T13:19:49+5:302023-09-02T13:20:39+5:30

खरोखर मृतदेह नदीत फेकला की आरोपींकडून ‘फिल्मीस्टाइल थिअरी’?

A month has passed, BJP Sana Khan's body not found yet, remains a mystery | एक महिना उलटला, सना खानच्या मृतदेहाचे रहस्य अद्याप कायमच

एक महिना उलटला, सना खानच्या मृतदेहाचे रहस्य अद्याप कायमच

googlenewsNext

नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्येला शनिवारी एक महिना पूर्ण होत आहे. हत्येला एक महिना उलटूनदेखील सना खान यांचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही व हीच बाब पोलिसांची सर्वात मोठी डोकेदुखी ठरते आहे. अशा स्थितीत हे रहस्य आणखी किती दिवस कायम राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान खरोखर आरोपी अमित साहू व त्याच्या साथीदारांनी सना यांचा मृतदेह नदीत फेकला की त्यांच्याकडून त्याची दुसऱ्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली, या दिशेनेदेखील चौकशी सुरू आहे.

२ ऑगस्ट रोजी सना खान जबलपूरला पोहोचल्या होत्या व त्यानंतर थेट अमित साहू याच्या घरी गेल्या होत्या. तेथे त्यांचा अमितशी जोरदार वाद झाला व अमितने त्यांची हत्याच केली. जोरजोराने येणारा भांडणाचा आवाज शेजाऱ्यांनीदेखील ऐकला होता व तो अचानक शांत झाल्याने त्यांनी दुर्लक्ष केले होते. त्याच दिवशी अमितने सना यांचा मृतदेह हिरन नदीत फेकला होता. पावसाचा जोर जास्त असल्याने मृतदेह दूर अंतरापर्यंत वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. सना खान यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना यश आलेले नाही. आतादेखील मानकापूर पोलिस ठाण्याची दोन पथके मध्य प्रदेशमध्ये असून हिरन नदीच्या किनारपट्टीवरील वस्त्यांमध्येदेखील विचारणा सुरू आहे. सना खान यांचा मृतदेहच काय तर कपडे किंवा इतर काही सामानदेखील सापडलेले नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाची माहिती देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले असले तरी हत्येच्या एका महिन्यानंतर त्याचा किती फायदा होईल हा प्रश्नच आहे.

आई, मुलाची प्रतीक्षा कायम

सना खान यांची आई मेहरून्निसा व त्यांचा लहान मुलगा २ ऑगस्टपासून सातत्याने त्यांच्या प्रतीक्षेत होते. सना यांच्या हत्येची बाब समोर आल्यावर त्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र आईने स्वत:ला सावरले व काहीही करून कमीत कमी मुलीचा मृतदेह तरी शोधून द्या अशी आर्त विनंती त्या करत आहेत.

इतर ‘लिंक्स’चा तपास कुठपर्यंत?

अमित साहूचा मित्र धर्मेंद्र यादव याच्या सांगण्यावरून त्याचा उजवा हात कमलेश पटेलने सना खान यांचे मोबाइल नर्मदा नदीत फेकले. पोलिसांनी अमित साहूसह धर्मेंद्र यादव, कमलेश पटेल, रब्बू यादव या आरोपींनादेखील अटक केली. तसेच मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांची चौकशीदेखील झाली. या प्रकरणातील इतर लिंक्सचा तपास होईल, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र नवीन लिंक्सबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणातील सर्वच आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. अशा स्थितीत अमित साहूच्या नार्को टेस्टची विनंती न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता सत्य नेमके बाहेर कसे काढायचे हा पोलिसांसमोरील मोठा प्रश्न आहे.

Web Title: A month has passed, BJP Sana Khan's body not found yet, remains a mystery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.