अहमदनगरला होणार सहकार तत्त्वावरील नवे शेळी मेंढी विकास महामंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 08:31 PM2023-04-12T20:31:34+5:302023-04-12T20:33:46+5:30
Nagpur News राज्यात दुसरे नवे शेळी-मेंढी विकास महामंडळ स्थापन होणार असून सहकार तत्त्वावरील या महामंडळाच्या मुख्यालयासाठी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गृहजिल्हा अहमदनगरचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.
नागपूर : राज्यात दुसरे नवे शेळी-मेंढी विकास महामंडळ स्थापन होणार असून सहकार तत्त्वावरील या महामंडळाच्या मुख्यालयासाठी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गृहजिल्हा अहमदनगरचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.
सध्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळ सहकार तत्त्वावर नाही आणि केंद्र सरकारने मेष पालनासाठी देऊ केलेल्या दहा हजार कोटींसाठी सहकार तत्त्वाची अट घातल्याने या नव्या महामंडळाची स्थापना केली जात आहे. सध्याच्या महामंडळाला दिलेल्या भाग भांडवलातील ९० कोटींची रक्कम नव्या महामंडळाच्या स्थापनेसाठी खर्च करण्याचा विचार सुरू असून नव्या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील बारा लाख शेळी-मेंढीपालक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज, गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नव्या महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात मंडळाची रचना, व्याप्ती, करावयाची कामे आदी बाबी निश्चित केल्या जातील.
‘अहिल्यादेवी’ महामंडळाचे ९० कोटी वळवणार
-पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळाला भाग भांडवलाच्या रूपात दिलेल्या शंभर कोटींपैकी अखर्चित असलेला ९० कोटी रुपयांचा निधी देखील या नव्या महामंडळासाठी वळविण्यात येणार आहे. या निधीतून नव्या महामंडळाच्या कामकाजासाठी जमीन खरेदी, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आदी कामे केली जाण्याची शक्यता आहे.