देशद्रोहाच्या बदल्यात पाकिस्तानकडून निशांत अग्रवालला ३० ते ३८ हजार यूएस डॉलर्सचे पॅकेज
By नरेश डोंगरे | Published: June 3, 2024 06:04 PM2024-06-03T18:04:39+5:302024-06-03T19:19:46+5:30
डीआरडीओच्या ब्रम्होस एअरोस्पेस प्लान्टमध्ये हेरगिरी : यंग सायंटिस्ट अवार्ड, देशद्रोह ते आयएसआय एजंटचा प्रवास
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदेशी ललनांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून देशद्रोह करणाऱ्या निशांत अग्रवालला शत्रूराष्ट्र पाकिस्तानने ३० ते ३८ हजार यूएस डॉलर्सच्या पॅकेजचे आमिष दाखविले होते. त्याला बळी पडून निशांतने तब्बल १८ महिने आयएसआयचा एजंट बणून काम केले. या कालावधीत त्याने शत्रूराष्ट्राला भारताची शक्ती आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशिल माहिती पुरिवली होती.
मिलिटरी इंटेलिजन्स आणि यूपी एटीएसने संयुक्त कारवाई करून ८ ऑक्टोबर २०१८ च्या पहाटे निशांत अग्रवालच्या सोमलवाड्यातील घरातून मुसक्या आवळल्या होत्या. त्याचे मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य ईलेक्ट्रॉनिक उपकरणातून तो पाकिस्तानचा हेर म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. न्यायालयाने आज ३ जून २०२४ ला निशांतला हेरगिरी करण्याच्या आरोपात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा नव्याने चर्चेला आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक घडामोडी पढे आल्या.
विशेष म्हणजे, अटक होण्यापूर्वीपर्यंत निशांत एक अत्यंत हुशार आणि तीक्ष्ण बुद्धीचा वैज्ञानिक म्हणून संपूर्ण देशात नावारुपाला आला होता. नागपुरातील डीआरडीओच्या ब्रम्होस एअरोस्पेस प्लान्टमध्ये कार्यरत असलेल्या निशांतला देशाचा यंग सायंटिस्ट अवार्ड देऊन गाैरविण्यात आले होते. त्याने हा फोटो त्याच्या फेसबूक प्रोफाईलवर अपलोड केला होता. ते पाहून त्याला पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने टिपले होते. आयएसआयसाठी काम करणाऱ्या कथित सेजल कपूर आणि नेहा शर्मा या देखण्या तरुणींनी निशांतला फेसबूकवर फ्रेण्ड बनविल्यानंतर त्याच्याशी सलगी वाढवली. त्याला वेगवेगळे आमिष दाखवून जाळ्यात घेतल्यानंतर सेजल आणि नेहाने कॅनडात बसलेल्या कथित बॉससोबत त्याची ओळख करून दिली होती. बॉसने निशांतकडून ऑनलाईन प्रेझेंटेशन घेतल्यानंतर त्याला ऑफर दिली. दररोज ब्रम्होसशी संबंधीत घडणाऱ्या घडामोडी तू सांकेतिक पद्धतीने सांगायच्या. त्याबदल्यात तुला ३८ हजार यूएस डॉलर्स मिळतील. सोबत सेजल आणि नेहा तुला पाहिजे तेव्हा, पाहिजे ते देण्यासाठी तत्पर असतील, अशी ही ऑफर होती. त्याला बळी पडून निशांत हेरगिरीच्या दलदलीत फसला. त्यानंतर बॉसने निशांतला एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन केल्यापासून निशांत त्याच्या लॅपटॉपवर तसेच मोबाईलवर ब्रम्होसशी संबंधित जे काही काम करायचा, तो सर्व डाटा अॅटोमॅटिक पाकिस्तान, लंडन आणि कॅनडात बसलेल्या बॉसकडे पोहचत होता. अर्थात, ब्रम्होसशी संबंधित सर्वच्या सर्व घडामोडी डे-टू-डे आयएसआयला कळत होत्या.
कानपुरातील महिला अडकली अन्
निशांतचाही भंडाफोड झाला
११ मार्च २०१७ ते ६ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचा ब्रम्होसशी संबंधित डाटा त्याने आयएसआयला पुरविल्याचा संशय होता. २०१८ ला मिलिटरी इंटेलिजन्स आणि यूपी एसटीएसने अच्युतानंद मिश्रा आणि कानपूरमध्ये एका महिलेला अटक केली. त्यांच्याकडील ईलेक्ट्रॉनिक उपकरणातून निशांतचा कोड मिळाला अन् तो आयएसआयचा एजंट असल्याचे उजेडात आले. त्याचमुळे त्याला अटक करण्यात आली होती. आज सहा वर्षांनंतर न्यायालयाने त्याला त्याच्या पापाची शिक्षा सुनावली.
क्रूज मिसाईलच्या परिक्षणाचा अहवाल
११ मार्च २०१७ ला ब्रम्होस सुपरसोनिक क्रूज मिसाईलचे यशस्वी परिक्षण करण्यात आले होते. त्यातून बनविण्यात आलेल्या अहवालाचे मुद्दे एकत्रित करून एक अत्यंत संवेदनशिल रिपोर्ट तयार करण्यात आला होता. हा रिपोर्ट, निशांतने प्रेझेंटेशनसह वेगवेगळ्या स्वरूपात पाकिस्तानी आयएसआयला सोपविल्याचा अंदाज वजा निष्कर्ष पुढे आला होता.
लोकमतचे वृत्त अन् तीन दिवसानंतर कारवाई
पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने हनी ट्रॅपच्या माध्यमातून सुरक्षेशी संबंधित काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना फसविण्याचे षडयंत्र रचल्याचे तसेच फेसबूक फ्रेण्ड हेरगिरी करवून घेऊ शकतो, अशा मथळ्याचे वृत्त 'लोकमत'ने ५ ऑक्टोबर २०१८ ला प्रकाशित केले होते. त्यानंतर तीनच दिवसांनी ही कारवाई झाल्याने त्यावेळी 'लोकमत'वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा प्रचंड वर्षाव झाला होता.