त्याने घरालाच केले गॅस चेंबर, कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न

By योगेश पांडे | Published: February 20, 2024 05:06 PM2024-02-20T17:06:57+5:302024-02-20T17:08:27+5:30

पाईप काढून गॅस सिलिंडर केले लिक, घरगुती वादातून आत्मघातकी पाऊल- पत्नी, मुलांना खोलीत केले बंद.

a person made a gas chamber at home tried to kill his family members in nagpur | त्याने घरालाच केले गॅस चेंबर, कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न

त्याने घरालाच केले गॅस चेंबर, कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न

योगेश पांडे,नागपूर : घरगुती वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात अक्षरश: सैतान घुसला व त्याने चक्क कुटुंबियांना एका खोलीत बंद करून गॅस सिलिंडर लिक करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पत्नीने समयसूचकता दाखवत पोलीस व नातेवाईकांना वेळीच कळविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. यात जर आरोपीने खरोखर माचीसची काडी पेटवली असती तर आजुबाजूच्या घरांचेदेखील मोठे नुकसान झाले असते.

रंजन गणेशप्रसाद शाव (४६, युनिक शैलपुत्री अपार्टमेंट, जगनाडे ले आऊट, ओमनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो एका कोऑपरेटिव्ह बॅंकेत मुख्य लिपीक म्हणून कार्यरत आहे. २०२० साली त्याचे पत्नी मिनूशी भांडण झाले होते व त्याने तिला मारहाण केली होती. यानंतर असा प्रकार परत करणार नाही असा शब्द दिल्यानंतर त्यांच्यात परत समेट झाला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास घरगुती वादातून तो संतापला व त्याने पत्नी, १४ वर्षांचा मुलगा व ८ वर्षांच्या मुलीला खोलीत बंद केले. त्यानंतर त्याने घरातील गॅस सिलिंडरचा पाईप काढला व सिलिंडर सुरू केला. त्याने हातात माचीस घेतली व ती पेटविण्याची धमकी देत होता. धोका ओळखून त्याच्या पत्नीने पोलीस तसेच तिच्या भावाला फोन केला. तिचा भाऊ विवेक कुमार लाल याने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत पोलीसांचे पथकदेखील पोहोचले होते. अग्निशमन दल व स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी दरवाजा तोडत आरोपी शाव याला पकडले. त्यानंतर तातडीने इतर कुटुंबियांना घराबाहेर काढण्यात आले. विवेकच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

परिसरात खळबळ, शेजारच्यांचा जीव टांगणीला :

शाव याच्या संपूर्ण घरात सिलिंडरचा गॅस पसरला होता. बाहेरदेखील त्याचा वास येत होता. जर शावने माचीस पेटवली असती तर अपार्टमेंटमधील इतर फ्लॅट्सलादेखील धोका पोहोचला असता. त्यामुळे शेजारच्यांचा जीवदेखील टांगणीला लागला होता. पोलीस व अग्निशमन दलाच्या पथकाने दरवाजा तोडून शावला ताब्यात घेतल्यावर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: a person made a gas chamber at home tried to kill his family members in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.