मेडिकलमध्ये विषारी घाेणस सापाने उडविला गाेंधळ
By निशांत वानखेडे | Published: July 10, 2024 05:08 PM2024-07-10T17:08:44+5:302024-07-10T17:11:36+5:30
Nagpur : बालकांच्या वाॅर्डबाहेर दिसल्याने नातेवाईकांची तारांबळ
नागपूर : शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडिकल) बुधवारी दुपारच्या सुमारास विषारी साप निघाल्याने एकच धावपळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा साप मेडिकलमध्ये लहान मुलांच्या वार्डबाहेर दिसून आला. सुदैवाने कुठलीही अनुचित घटना घडली नाही. हा घाेणस साप असल्याचे नंतर लक्षात आले. सर्पमित्राने त्याला पकडून सुरक्षित स्थळी साेडले.
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजताच्या सुमारास लहान मुलांच्या वॉर्ड क्रमांक ५० च्या आयसीयूबाहेर सापाचे पिल्लू दिसल्याने वैद्यकीय रुग्णालयात घबराट पसरली. साप दिसताच महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी वाइल्डलाइफ वेलफेअर संस्थेचे सचिव नितीश भांडक्कर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लागलीच मेडिकलमध्ये पाेहचून शिताफीने सापाला पकडले आणि नंतर सुरक्षित स्थळी नेवून साेडले. मात्र या घटनेने मेडिकलमध्ये काही काळ माेठी पळापळ झाली हाेती.
घोणस साप अत्यंत विषारी प्रजातीचा मानला जाताे. सध्या पावसामुळे सर्पदंशाचे अनेक रूग्ण रूग्णालयात दाखल होत आहेत. या महिन्यात सर्पदंश झालेल्या सुमारे १४ रुग्णांनी वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीशी संपर्क साधल्याचे भांदक्कर यांनी सांगितले.