इलेक्ट्रिक डीपीला हात लावून पोलिसाने संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 09:39 PM2023-06-26T21:39:54+5:302023-06-26T21:40:24+5:30
Nagpur News तणावातून इलेक्ट्रिक डीपीला हात लावून पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २६ जून रोजी दुपारी ३:२० वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत पेन्शननगर येथे घडली.
नागपूर : तणावातून इलेक्ट्रिक डीपीला हात लावून पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २६ जून रोजी दुपारी ३:२० वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत पेन्शननगर येथे घडली.
काशिनाथ भगवान कराडे (वय ४०, मूळचे रा. कराडवाडी, खंडाळा, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. ते माजी सैनिकही होते. काशिनाथ हे पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. ते एका पोलिस कर्मचाऱ्यासह पेन्शननगर येथे भाड्याने राहत होते. मागील काही दिवसांपासून ते तणावात वावरत होते. सोमवारी दुपारच्या वेळी ते घरासमोरील इलेक्ट्रिक डीपीजवळ आले. त्यांनी डीपीला हात लावल्यामुळे ते विजेचा धक्का लागून होरपळले. काही क्षणांत ते खाली कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. नातेवाईक व सहकारी पोलिसांच्या बयाणानंतर त्यांच्या आत्महत्येचे कारण पुढे येऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.
.............