राजकीय नेते वेगळा विदर्भ देऊ शकत नाही; प्रशांत किशोर यांची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 07:02 PM2022-09-20T19:02:33+5:302022-09-20T19:03:11+5:30
Nagpur News राजकीय नेते कधीही विदर्भ वेगळा करू शकणार नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या आंदोलनात लोकांना जोडावे लागेल. तरच या आंदोलनाचा दबाव दिल्लीत वाढेल, असे स्पष्ट मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला ७० वर्ष झाली. ज्या राजकीय नेत्यांच्या खांद्यावर विदर्भाच्या आंदोलनाची धुरा दिली त्यांनी आंदोलनाच्या नावावर स्वत:च्या पोळ्या शेकल्या. त्यामुळे राजकीय नेते कधीही विदर्भ वेगळा करू शकणार नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या आंदोलनात लोकांना जोडावे लागेल. तरच या आंदोलनाचा दबाव दिल्लीत वाढेल, असे स्पष्ट मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
‘मिशन ३० राज्य विदर्भ’ या अभियानाअंतर्गत विदर्भाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून किशोर यांची टीम विदर्भाची माहिती संकलित करीत असून, या संदर्भात स्थानिक लोकांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. या मिशन अंतर्गत समन्वयकाची जबाबदारी माजी आमदार आशिष देशमुख यांनी घेतली असून, त्यांच्या नेतृत्वात मंगळवारी चिटणवीस सेंटरमध्ये विदर्भावाद्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. फिरदोस मिर्झा, विजया धोटे, माजी आमदार चरण वाघमारे, सेवक वाघाये, ॲड. मुकेश समर्थ, प्रदीप माहेश्वरी, अहमद कादर उपस्थित होते. बैठकीला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून विदर्भवादी सहभागी झाले होते. प्रशांत किशोर यांनी बैठकीत सहभागी लोकांच्या भूमिका जाणून घेतल्या. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
- मी फक्त विदर्भाची माहिती घेत आहे
वेगळा विदर्भ होऊ शकतो. त्यामागची कारणे वेगवेगळी आहे. आतापर्यंत आंदोलन झाले; पण त्याला का यश आले नाही. नव्या आंदोलनासाठी वेगळा पक्ष, वेगळा मंच स्थापन करावा, नेतृत्व कुणाला द्यावे, याबाबत कुठलेही नियोजन अजून केले नाही. मी फक्त विदर्भाची माहिती घेत आहे. त्या माहितीला एका साच्यात बसवून, हे आंदोलन कसे पुढे नेता येईल, याची रणनीती लवकरच आखणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.
- जून २०२३ पर्यंत ॲक्टिव्ह सदस्य जोड
या आंदोलनात मी आपली शक्ती व बुद्धी लावणार आहे. सुरुवातीला ५० लोकांची वर्किंग ग्रुप कमिटी बनवायची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतून एक सदस्य या आंदोलनाशी जोडायचा आहे. विदर्भातून १० हजार ॲक्टिव्ह लोकं जुळल्यानंतर एक जॉईंट ॲक्शन कमिटी स्थापन करायची आहे. त्यासाठी पुढच्या २३ जून पर्यंत १० हजार ॲक्टिव्ह लोकांना आंदोलनाशी जोडा असे आवाहन प्रशांत किशोर यांनी केले.