अपघातामुळे कोमात गेलेल्या गरोदर महिलेची केली आधी प्रसूती, नंतर मेंदूवर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 06:02 PM2022-03-01T18:02:12+5:302022-03-01T18:04:32+5:30
Nagpur News अपघाताने कोमात गेलेल्या महिलेचे प्राण आधी वाचवावेत की तिच्या बाळाचे असा यक्ष प्रश्न पडलेल्या डॉक्टरांनी बाळ व बाळंतिणीचे रक्षण करून नवे जीवदान दिले.
नागपूर : नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा अपघात झाल्याने ती कोमामध्ये गेली. मेंदूमध्ये रक्ताची मोठी गाठ तयार झाली. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत होते. ‘पॉलीट्रॉमा’ची परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेतला. प्रथम कोमात असताना महिलेची प्रसूती केली, नंतर मेंदूवर शस्त्रक्रियाही केली. डॉक्टरांच्या या पुढाकारामुळे मातृत्वाचे रक्षण झाले, आईला व नवजात बाळाला जीवदान मिळाले.
भंडारा येथील २२ वर्षीय गर्भवती महिला पतीसोबत डॉक्टरांकडे जात असताना दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली. भंडारा येथे प्राथमिक उपचारानंतर नागपुरात डॉ. निर्मल जयस्वाल यांच्याकडे पाठविण्यात आले. रुग्ण नागपुरात आला तेव्हा फार गंभीर अवस्थेत होता. श्वास घेण्यास त्रास होता व ऑक्सिजनचे प्रमाणदेखील कमी होत होते. रुग्ण डीप कोमाच्या अवस्थेत जात होता. शिवाय अन्य अवयव निकामी होण्याच्या धोकाही निर्माण झाला होता. गर्भारपणामध्ये झालेला अपघात, मेंदूला झालेली इजा, श्वास घेताना होणारा त्रास व पर्यायाने कमी होणारा ऑक्सिजन अशा प्रकारची तीव्र जोखीम असताना डॉ. जयस्वाल यांनी प्रसूती करून मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. नातेवाइकांकडून प्रतिसाद मिळताच रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेत जोखिमीच्या परिस्थितीमध्ये महिलेची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीपश्चात तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली.
प्रसूती पश्चात बाळ रडलेच नाही
प्रसूती पश्चात तीन ते पाच मिनिटांहून अधिक काळ झाले तरी बाळ रडले नाही. यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. बालरोगतज्ज्ञांनी तातडीने बाळाला वाचविण्यासाठी आवश्यक उपचाराला सुरुवात केली. दुसरीकडे महिलेच्या मेंदूवर गुंतागुंतीची शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. डॉक्टरांचे अथक परिश्रम, अनुभव व कौशल्याच्या बळावर आई व बाळाला जीवदान मिळाले. ही शस्त्रक्रिया डॉ. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात न्युरोसर्जन डॉ. आलोक उमरेडकर, स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. श्वेताली देशमुख, बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना जयस्वाल, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भावेश बरडे व बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रवी मुंदडा यांनी केली.
अशा रुग्णांमध्ये वेळ महत्त्वाचा
महिला रुग्णालयात आली तेव्हा तिची परिस्थिती फार गंभीर होती. यामुळे वेळेत निर्णय घेऊन उपचार करणे गरजेचे होते. तिच्या कुटुंबातील लोकांनी डॉक्टरांवर विश्वास दाखविल्यामुळेच व डॉक्टरांनी सामूहिक प्रयत्न केल्याने दोन जीव वाचविता आले.
-डॉ. निर्मल जयस्वाल, आयसीयू डायरेक्टर