गळ्यातील ओढणीने घेतला तरुणीचा जीव; वहिनीसह भाचा थाेडक्यात बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 10:22 PM2023-02-14T22:22:54+5:302023-02-14T22:23:24+5:30
Nagpur News भाच्याला दवाखान्यात नेत असताना तरुणीच्या गळ्यात व चेहऱ्याला बांधलेली ओढणी दुचाकीच्या समाेरच्या भागात अडकली आणि तिघेही खाली काेसळले. यात तरुणीच्या गळ्याला ओढणीचा फास लागल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
नागपूर : भाच्याला दवाखान्यात नेत असताना तरुणीच्या गळ्यात व चेहऱ्याला बांधलेली ओढणी दुचाकीच्या समाेरच्या भागात अडकली आणि तिघेही खाली काेसळले. यात तरुणीच्या गळ्याला ओढणीचा फास लागल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर, भाचा व वहिनी थाेडक्यात बचावले. ही घटना कामठी (नवीन) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील अजनी (रडके) शिवारात नुकतीच घडली.
वैष्णवी रामहरी लाडस्कर (१७, रा. अजनी रडके, ता. कामठी) असे मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवीच्या भावाचा दीड वर्षाचा मुलगा आजारी असल्याने ती साेमवारी (दि. ६) सकाळी त्याला घेऊन एमएच-४०/एस-२०६४ क्रमांकाच्या दुचाकीने कामठी शहरात येत हाेते. भाचा व तिची वहिनी स्वाती (२५) मागे बसली हाेती तर ती दुचाकी चालवित हाेती. गावापासून काही दूर आल्यावर तिने चेहरा व गळ्याला बांधलेल्या ओढणीचा काेपरा तिच्या दुचाकीच्या पुढच्या भागात अडकला. त्यामुळे ताेल गेल्याने तिघेही खाली काेसळले.
यात तिच्या गळ्याला ओढणीचा फास अडकल्याने ती बेशुद्ध पडली. मात्र, दाेघांनाही कुठलीही दुखापत झाली नाही. वहिनीने घरच्यांना सूचना देत तिला सुरुवातीला कामठी शहरातील हाॅस्पिटलमध्ये केले. त्यानंतर तिला नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे साेमवारी (दि. १३) रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.