उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यासमोर भरली 'प्रश्नचिन्ह अनाथ मुलांची शाळा'

By आनंद डेकाटे | Published: September 6, 2024 06:11 PM2024-09-06T18:11:35+5:302024-09-06T18:14:17+5:30

आदिवासी फासे पारधी समाजाच्या अभिनव आंदोलनाने वेधले लक्ष : शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी

A question mark on school for orphans filled in front of Deputy Chief Minister Fadnavis' 'Devagiri' bungalow | उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यासमोर भरली 'प्रश्नचिन्ह अनाथ मुलांची शाळा'

A question mark on school for orphans filled in front of Deputy Chief Minister Fadnavis' 'Devagiri' bungalow

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
अमरावती जिल्ह्यातील आदिवासी फासे पारधी समाजाच्या ‘प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळे’चे निम्मे बांधकाम समृद्धी महामार्गात तोडण्यात आले. तेव्हा आश्रमशाळेचे बांधकाम नव्याने उभारण्यासाठी ६ कोटी रुपयांची मदत दिली जाईल, असे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते. शासनाने दिलेल्या त्या आश्वासनाची तातडीने पूर्तता करावी या मागणीसाठी या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील देवगिरी या शासकीय बंगल्यासमोरच शाळा भरवित आंदोलन केले. या अभिनव आंदोलनाद्वारे शाळेतील इतर मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात आले.

दादाजी आदिवासी फासे पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मतीन भोसले यांनी सांगितले की, मंगरूळ चव्हाळा, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती येथे प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा २०११ पासून सुरू आहे. २०१४ रोजी त्याला शासकीय मान्यता मिळाली आहे. १ ते १० वर्गापर्यंतच्या या आश्रमशाळेत फासे पारधी समाजाचे ९५ टक्के विद्यार्थी तर धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांतील कोरकू समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पारधी समाजातील अनाथ मुलांनाही येथे शिक्षण दिले जाते. संपूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते. मोठ्या मेहनतीने ही संस्था उभारण्यात आली. समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू असताना या आश्रमशाळेचे निम्मे बांधकाम तोडण्यात आले. तेव्हा फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांना आम्ही निवेदन दिले तेव्हा आश्रमशाळा उभारण्यासाठी शासनातर्फे सहा कोटी रुपयांची मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करावी, यासाठी आम्ही येथे आलो आहोत. यासोबतच शाळेतील तीन शिक्षकांना अप्रशिक्षित शिक्षक म्हणून सामावून घेण्याचा शासन निर्णय जारी झाला आहे, त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय फासे पारधी समाजातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.

Web Title: A question mark on school for orphans filled in front of Deputy Chief Minister Fadnavis' 'Devagiri' bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर