'त्यांच्या' जीवनात फुलणार खरी 'स्वातंत्र्य पहाट', कुणी १० तर कुणी १२ वर्षानंतर उपभोगणार स्वातंत्र्याचा आनंद
By नरेश डोंगरे | Published: August 14, 2023 03:23 PM2023-08-14T15:23:16+5:302023-08-14T15:25:40+5:30
१५ ऑगस्ट स्पेशल : 'ते' होणार मुक्त,
नरेश डोंगरे
नागपूर : क्षणिक रागातून निर्माण झालेल्या वादानंतर आक्रित घडले. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायव्यवस्थेने त्यांच्यावर आरोपी म्हणून ठपका ठेवला आणि पोलिसांनी त्यांना कारागृहात डांबले. त्यांचे स्वातंत्र्य हिरावले गेले. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांच्या निर्दोष कुटुंबियांनाही सहन करावी लागली. गुन्हेगारी वृत्ती नसल्यामुळे कारागृहातील अट्टल गुन्हेगारांसोबत राहूनही ते मात्र गुन्हेगार नाही बनले. अशा अनेक गुन्हेगारांच्या जीवनात स्वातंत्र्यांची पहाट उगविणार आहे. होय, सरकारच्या एका योजनेनुसार, विदर्भातील विविध कारागृहात बंदिस्त असलेल्या ६५ गुन्हेगारांना उद्या १५ ऑगस्टला कारागृहातून मुक्त केले जाणार आहे. त्यामुळे आता त्या ६५ बंदीवानांच्या जीवनात रोज खरीखुरी स्वातंत्र्याची पहाट फुलणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना इंग्रज सरकार कालकोठरीत टाकत होते. कारागृहाच्या भेसूर भिंतीआड डांबून त्यांच्यावर अणन्वित अत्याचार करीत होते. तो काळ गुलामीचा होता आणि त्यामुळे त्या काळात कारागृहात राहणाऱ्यांना समाजात वेगळा मान मिळत होता. आता मात्र कारागृहात राहणाऱ्यांविरुद्ध समाज तिरस्कृत नजरेने बघतो. कारण ही मंडळी समाजात राहून समाजकंटकांची भूमीका वठवित असते. कुणाच्या जानमालावर, अब्रूवर, संपत्तीवर वाकडी नजर ठेवून असते. त्यामुळे अशा समाजकंटकांना पोलीस न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून कारागृहात डांबते. मात्र, कारागृहात डांबले जाणारे सर्वच गुन्हेगार असतात असेही नाही.
कारागृहात डांबल्या गेलेल्या अनेकांची वृत्ती गुन्हेगारांची नसते. त्यांची तशी मानसिकताही नसते अन् दुसऱ्या कोणत्या गुन्ह्यांचा त्यांचा रेकॉर्डही नसतो. 'त्यावेळी' क्षनिक संतापाच्या भरात त्यांच्या हातून गुन्हा घडतो. काही जण गुन्हा करणाऱ्यांच्या सोबत असल्यामुळे शिक्षेस पात्र ठरतात आणि त्यामुळे त्यांना कारागृहातील कोठडीत जावे लागते. अशा गुन्हेगारांना दिलासा देण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सरकारने २०२२ मध्ये एक योजना सुरू केली होती. त्यानुसार, उद्या १५ ऑगस्ट २०२३ ला राज्यातील एकूण १८६ तर, विदर्भातील ६५ बंदीवानांना पुढच्या शिक्षेत सुट देऊन कारागृहातून मुक्त केले जाणार आहे.
कारागृह आणि मुक्त होणारे बंदीवान
नागपूर मध्यवर्ती कारागृह : २३
अमरावती मध्यवर्ती कारागृह : १९
अमरावती खुले कारागृह : ०५
अकोला जिल्हा कारागृह : ०६
मोर्शी खुले कारागृह : ०१
वर्धा खुले कारागृह : ०२
वर्धा जिल्हा कारागृह : ०१
वाशिम कारागृह : ०१
भंडारा : ०१
चंद्रपूर जिल्हा कारागृह : २
गडचिरोली कारागृह : ४
मुक्त होणारे एकूण बंदीवान : ६५
मुक्त होणारे अनेक बंदीवान पश्चातापाच्या भट्टीत पोळून निघाले आहे. ते आता जागरुक आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरतील, असा विश्वास वाटतो !
- गीता आगे, उपअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, नागपूर.