अबब...सहा हजार किलोच्या कढईत बनला विक्रमी चिवडा, विष्णू मनोहरांचा जागतिक खाद्य दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम
By मंगेश व्यवहारे | Published: October 16, 2022 05:12 PM2022-10-16T17:12:49+5:302022-10-16T17:13:28+5:30
Vishnu Manohar: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खास पद्धतीने चिवडा बनविला. जागतिक खाद्य दिनानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहा हजार किलोच्या कढईत तयार केलेला चिवडा नक्कीच विश्वविक्रमी ठरला.
- मंगेश व्यवहारे
नागपूर : दिवाळीत चमचमीत फराळाची रेलचेल असते. आता घरोघरी चिवडा आणि फराळाला सुरुवात होणार आहे. महिलांना नावीन्यपूर्ण चिवडा बनविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘विष्णूजी की रसोई’ येथे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खास पद्धतीने चिवडा बनविला. जागतिक खाद्य दिनानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहा हजार किलोच्या कढईत तयार केलेला चिवडा नक्कीच विश्वविक्रमी ठरला.
आयोजनस्थळी विष्णू मनोहर यांच्या रेसिपीच्या फॅन्स खास करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रसोईमधील खुल्या रंगमंचावर या उपक्रमाचे आयोजन केले होते. पहाटेपासूनच त्यासाठी लगबग सुरू झाली होती. ६०० किलो चिवडा, ४०० किलो तेल, १०० किलो शेंगदाणे, १०० किलो काजू, ५० किलो किसमिस, २५० किलो मसाले हे साहित्य यासाठी वापरण्यात आले होते. ६००० किलोच्या कढईत बसेल एवढा चिवडा येथे तयार करण्यात आला. या उपक्रमाला कांचनताई गडकरी, एसीपी अशोक बागूल, माजी महापौर संदीप जोशी, आशुतोष शेवाळकर, राजे मुधोजी भोसले, आमदार विकास कुंभारे, डॉ. उदय बोधनकर आदी उपस्थित होते.
सामाजिक संस्थांना व गरीब कुटुंबांनाही वाटप
- हा चिवडा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली, मेळघाटसारख्या दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहचवला जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील अनाथालय, अंध विद्यालयातही त्याचे वितरण होणार आहे.