कळमन्यात टळली अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती; ऐनवेळी पोलीस आल्यामुळे वाचला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 01:00 PM2022-11-18T13:00:28+5:302022-11-18T13:01:58+5:30
गुंडाच्या दहशतीमुळे नागरिक होते त्रस्त
नागपूर : महिलांना नग्न करून अत्याचार करण्याची धमकी देणाऱ्या अक्कू यादवच्या धर्तीवर कळमना येथे एका गुुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न फसला. अखेरच्या क्षणी पोलिसांनी गुन्हेगार रत्नाकर ऊर्फ बाल्या जनार्दन लोणेरे याला पकडल्याने मोठी घटना टळली. या घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
३९ वर्षीय बाल्या परिसरात खूपच कुप्रसिद्ध आहे. मद्यधुंद अवस्थेत महिलांना शिवीगाळ करत अत्याचाराची तो धमकी देतो. परिसरातील लोकांनी त्याच्याबद्दल पोलिसांकडे तक्रारही केली आहे; परंतु अदखलपात्र प्रकरणाची नोंद झाल्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई केली नाही. बुधवारी रात्री ८ वाजता एक ६५ वर्षीय वृद्ध महिला घराजवळ उभी असताना बाल्या तिथे आला. त्याने वृद्ध महिलेला शिवीगाळ करत आक्षेपार्ह बोलण्यास सुरुवात केली. त्याने त्याचा मित्र हरीश खानोरकर यालाही तेथे बोलावले.
तोदेखील महिलांना शिवीगाळ करून धमकावू लागला. हे पाहून परिसरातील महिला जमा झाल्या. दोघेही महिलांना शिवीगाळ करत होते. काही वेळातच संपूर्ण कॉलनी जमा झाली. त्यात महिलांची संख्या अधिक होती. बाल्याच्या घराला लोकांनी घेराव घातला. 'याचा अक्कू यादव करा' असे म्हणत लोकांनी बाल्याला मारण्याची भूमिका घेतली. लोकांनी बाल्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याचा साथीदार फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच कळमना पोलजस घटनास्थळी दाखल झाले. एपीआय कोलवार आणि त्यांच्या टीमने संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सौम्य बळाचा वापर करून बाल्याची लोकांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. पोलिसांनी बाल्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.