जमाव अमनचा करणार होता ‘अक्कू’; आरोपींच्या घराची केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:35 PM2023-08-11T12:35:23+5:302023-08-11T12:36:54+5:30
महाकालीनगर झोपडपट्टीत तणाव, पोलिसांचा लाठीमार
नागपूर : बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाकालीनगर झोपडपट्टीत ‘अक्कू यादव’ हत्याकांडाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. अनेक दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या आरोपींनी एका मजुराचा खून केल्यानंतर वस्तीमध्ये प्रचंड संताप उसळला होता. आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर जमावाने आरोपींच्या घराची तोडफोड केली. तसेच एका आरोपीच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सोडविल्यामुळे कुटुंबीयांचा जीव वाचला. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
अमन नागेश चव्हाण (२२) या गुंडाने अल्पवयीन सहकाऱ्याच्या मदतीने मंगळवारी सुधाराम उर्फ रामा मंगल बाहेश्वर (४६) यांची हत्या केली होती. आरोपी व मृतक दोघेही वस्तीतीलच होते व कुत्र्याला ‘हड हड’ म्हटल्यावरून अमनने वाद घालत रामावर चाकूने वार केले होते. रामाच्या मृत्यूनंतर अमन व त्याच्या वडिलाविरुद्ध नागरिकांमध्ये संताप होता. पोलिसांनी वस्तीत बंदोबस्त तैनात केला होता व सुरक्षेचे कडे तोडत पहाटेच्या सुमारास अमन घरी परत आला व जेवणदेखील केले. त्यानंतर पोलिस येताच तो फरार झाला व सायंकाळनंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र, बुधवारी रात्री वातावरण आणखी तापले. दोनशेहून अधिक महिला पुरुष एकत्रित आले व त्यांनी अमनच्या घराची तोडफोड सुरू केली. पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
गुन्हेगारांचे घर वस्तीत नको
पोलिस शांततेचे आवाहन करत असतानादेखील जमावाने त्यांना जुमानले नाही. आम्हाला वस्तीत गुन्हेगारांचे घर नको आहे, असे म्हणत त्यांनी अल्पवयीन आरोपीच्या घराकडे मोर्चा वळवला. आरोपीच्या घरच्यांना लगेच घर रिकामे न केल्यास जिवे मारू, अशी धमकी देत त्यांना मारहाण सुरू केली. जमावाने घराची तोडफोडदेखील सुरू केली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील व भावाला कसेबसे जमावाच्या तावडीतून सोडविले.
लाठीमारानंतर जमाव झाला शांत
जमाव नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत लाठीमार केला. तसेच अधिक पोलिस बंदोबस्तदेखील बोलविण्यात आला. त्यानंतर जमाव काहीसा शांत झाला. पोलिसांनी १८ नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात संदीप मधुकर वाघमारे. सदेलाल गुरा पटेल, शंकर जगत पटेल, आनंद चौरे, रवी कावरे, कमलकिशोर बाहेश्वर, जितलाल पटेल, अनिल पटेल, राहुल नितोने, अशोक बागुल, टोपराम तुलसीकर, सुनील नागेश्वर, आशिष आचरे, प्रल्हाद पटेल, धनेंद्र गेडाम, गप्पू शाहू, मुकेश बाहेश्वर यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या दुर्लक्षामुळे जमाव संतप्त
आरोपी अमन व त्याचे वडील दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचेच आहेत. बेलतरोडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती होती, मात्र काहीच कारवाई झालेली नव्हती. हत्या केल्यानंतर आरोपी अमन हा निर्धास्तपणे वस्तीमध्ये फिरला. एकीकडे पोलिस त्याचा शोध घेत असताना पहाटे साडेचार वाजता तो घरी पोहोचला व आरामात जेवणदेखील केले. बेलतरोडी पोलिस ठाण्यातील पथकाला याची कल्पनाच नव्हती. हत्येमुळे वस्तीतील काही लोक जागे होते व अमनला पाहून त्यांना धक्काच बसला. संबंधित वस्तीत अगोदरदेखील हिंसेच्या घटना झाल्या आहेत. मात्र, बेलतरोडी पोलिस ठाण्यातील अधिकारी त्यांना फारसे गंभीरतेने घेत नाहीत. दरवेळी पोलिसांचे दुर्लक्ष होते, त्यामुळे गुन्हेगारांना स्वत:च धडा शिकविण्याचे जमावाने ठरविले. गुरुवारी दिवसभर वस्तीमध्ये पोलिस बंदोबस्त होता व तणाव कायम होता. कारवाईच होत नसल्याने लोकांनीदेखील पोलिसांना अशा घटना कळविणे बंद केले आहे.
बेलतरोडीच्या ठाणेदार मांडवघरे यांची उचलबांगडी
महाकालीनगर झोपडपट्टीतील गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना आलेले अपयश 'लोकमत'ने उघड केल्याने बुधवारी शहर पोलिसांत खळबळ उडाली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत ठाणेदार वैजयंती मांडवघरे यांची तत्काळ प्रभावाने गुन्हे शाखेत बदली केली. त्यांच्या जागी एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक कवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर निष्क्रिय ठाणेदारांची चिंता वाढली आहे.