शेवटच्या श्वासातही सामाजिक जबाबदारीचे भान; ७५ वर्षीय ज्येष्ठाचे अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 09:14 PM2023-03-02T21:14:35+5:302023-03-02T21:18:35+5:30

Nagpur News रेल्वेत असताना व सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे सामाजिक कार्य सुरूच होते. शेवटच्या श्वासातही सामाजिक जबाबदारीचे भान राखत त्यांनी यकृत, दोन्ही किडनी दान करून तिघांना जीवनदान दिले तर बुबुळाचे दान करून दोघांना दृष्टी दिली.

A sense of social responsibility even at the last breath; Organ donation of 75-year-old senior | शेवटच्या श्वासातही सामाजिक जबाबदारीचे भान; ७५ वर्षीय ज्येष्ठाचे अवयवदान

शेवटच्या श्वासातही सामाजिक जबाबदारीचे भान; ७५ वर्षीय ज्येष्ठाचे अवयवदान

googlenewsNext
ठळक मुद्देपत्नी, दोन्ही मुलांनी घेतला पुढाकार

नागपूर : रेल्वेत असताना व सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे सामाजिक कार्य सुरूच होते. शेवटच्या श्वासातही सामाजिक जबाबदारीचे भान राखत त्यांनी यकृत, दोन्ही किडनी दान करून तिघांना जीवनदान दिले तर बुबुळाचे दान करून दोघांना दृष्टी दिली.

बॅनर्जीनगर, भगवाननगर येथील लक्ष्मीनारायण नारनवरे (७५) त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ते ‘मॉर्निंग वॉक’ करत असताना त्यांना मागून एका दुचाकीने जोरदार धडक दिली. ते खाली कोसळून बेशुद्ध पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाच दिवसांच्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांच्या एका टीमने त्यांना तपासून ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘मेंदू मृत’ घोषित केले. नारनवरे हे रेल्वेत कर्मचारी असताना व सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. विशेषत: विधवांच्या पुनर्विवाहासाठी ते काम करत होते. त्यांचे सामाजिक कार्य आणि जिवंत असताना अवयवदानाची केलेली इच्छा पाहता त्यांचा पत्नी सरिता, मुलगा प्रदीप आणि प्रशांत व मुलगी प्रतिभा यांनी अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला. तशी इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केली.

याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक वीणा वाटोरे व दिनेश मंडपे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली.

- ५२ वर्षीय पुरुषाला यकृताचे दान

यकृत निकामी होऊन न्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाला नारनवरे यांच्या यकृताचे दान करण्यात आले. एक किडनी किम्स किंग्सवे हॉस्पिटलमधील ६२ वर्षीय महिलेला तर दुसरी किडनी केअर हॉस्पिटलमधील ४६ वर्षीय महिलेला दान करण्यात आली. महात्मे आयबँकला कॉर्निआ दान करण्यात आले.

- माझे पती तीन व्यक्तींमध्ये जिवंत

नारनवरे यांच्या पत्नी सरिता म्हणाल्या, अवयव मौल्यवान आहेत. हजारात एकालाच ते दान करण्याची संधी मिळते. माझे पती अवयवदानामुळे तीन व्यक्तींमध्ये जिवंत आहेत. मुलगा प्रशांत म्हणाले, जिवंतपणी त्यांनी व्यक्त केलेली इच्छा आम्हाला पूर्ण करता आली, याचे समाधान आहे.

Web Title: A sense of social responsibility even at the last breath; Organ donation of 75-year-old senior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.