लग्नाचे आमिष दाखवून बनविला शारीरिक संबंधाचा व्हिडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 08:40 PM2023-05-20T20:40:02+5:302023-05-20T20:40:30+5:30
Nagpur News लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधांचा व्हिडिओ काढून तो मित्राला पाठवणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने जाब विचारला असता, तो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून नर्सिंगला शिकणाऱ्या प्रेयसीचा शारिरीक संबंधाचा व्हिडीओ तयार करून तो मित्राला पाठविला. प्रेयसीने याबाबत विचारणा केली असता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध लकडगंज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
हर्षल अनिल ढोके (वय २२, रा. वॉर्ड क्र. ५, बसस्टॉप मागे, सावनेर) असे आरोपी युवकाचे नाव आहे. तो बीबीएला शिकत आहे. तर जरीपटका परिसरातील पिडीत १९ वर्षाची मयुरी (बदललेले नाव) नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. आरोपी हर्षल आणि मयुरीची ओळख मयुरीच्या मैत्रीणीच्या घरी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. इन्स्टाग्रामवर नियमित चॅटींग आणि फोनवर बोलणे सुरु झाल्यामुळे ते दोघे ऐकमेकांच्या प्रेमात पडले. याचा फायदा घेऊन आरोपी हर्षलने ३ मे रोजी मयुरीला भेटण्यासाठी सी. ए. मार्गावर बोलावले. जेवण करण्याच्या बहाण्याने तो मयुरीला हॉटेलच्या रुममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
केवळ शारिरीक संबंध प्रस्थापित करूनच तो थांबला नाही तर त्याने त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर १९ मे २०२३ रोजी तो मयुरीला सावनेरला घेऊन गेला. तेथे तिच्यासोबत पुन्हा शारिरीक संबंध प्रस्थापित केले. आरोपी हर्षलचा मोबाईल तपासताना त्याने शारिरीक संबंधाचा व्हिडीओ तयार करून आपल्या मित्राला पाठविल्याचे मयुरीच्या लक्षात आले. तिने याबाबत त्याला विचारणा केली असता आरोपीने व्हिडीओ पाठविला तो आपलाच दुसरा मोबाईल नंबर असल्याचे मयुरीला सांगितले. परंतु तिला ही बाब पटली नाही. तिला शंका आल्यामुळे तिने खडसावून जाब विचारला आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावर आरोपी हर्षलने तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपी हर्षल आपला व्हिडीओ व्हायरल करू शकतो, अशी शंका आल्यामुळे मयुरीने लकडगंज पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. लकडगंज पोलिसांनी आरोपी हर्षलविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.