नागपूर विद्यापीठात महाआघाडीला धक्का; शिक्षण मंचाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 10:34 AM2022-11-24T10:34:32+5:302022-11-24T10:37:55+5:30
२८ पैकी १५ जागा मंचाला
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठावर वर्चस्व प्रस्थापित असलेल्या डॉ. बबनराव तायवाडे आणि ॲड. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वातील महाआघाडी एकत्रित येऊन चांगलीच फसली. शिक्षण मंचाने यंदा अधिसभा निवडणुकीत महाआघाडीला जोरदार धक्का दिला. पहिल्यांदाच शिक्षण मंचाने अधिसभेच्या प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन प्रवर्गातील सिनेटच्या २८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला. तर महाआघाडीला ११ व ‘नुटा’ला दोन जागांवर समाधान मानावे लागले. मागच्या निवडणुकीत स्वतंत्र लढणाऱ्या यंग टीचर्सने ११ व सेक्युलर पॅनेलने १० जागा जिंकल्या होत्या. शिक्षण मंचाला केवळ ४ जागा जिंकता आल्या होत्या. नुटाने २ जागांवर विजय मिळवला होता.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी दहा वाजतापासून सुरुवात झाली. ती बुधवारी पहाटे ७ वाजेपर्यंत सुरू होती. मंगळवारी रात्री ८ वाजतापर्यंत विविध अभ्यास मंडळे, प्राचार्य आणि व्यवस्थापन प्रवर्गाचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर सर्वांत अधिक चुरस असणाऱ्या विद्या परिषदेच्या आणि त्यानंतर अधिसभेतील शिक्षक प्रवर्गाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्येही शिक्षण मंचाने सहा जागांवर विजय मिळवला. तर महाआघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.
मागील निवडणुकीमध्ये यंग टीचर्स व सेक्युलर पॅनेलने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. डॉ. तायवाडे आणि ॲड. वंजारी यांचे विद्यापीठातील प्राधिकरणांवर अनेक वर्षांपासून वर्चस्व होते. भाजप परिवारातील असलेल्या शिक्षण मंचाला अधिक जागा जिंकता न आल्याने त्यांनी मागील वर्षी नामनिर्देशित सदस्यांच्या भरवशावर विद्यापीठावर वर्चस्व मिळवले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शिक्षण मंचाने विद्यापीठ शिक्षक प्रवर्ग वगळता सर्वच जागांवर दमदार विजय मिळवला आहे.
आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशनला अभूतपूर्व यश
महाआघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशनला अभूतपूर्व यश मिळाल्याचा दावा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम यांनी केला आहे. ऑर्गनायझेशनचे उमेदवार डॉ. ओ. पी. चिमणकर, डॉ. वर्षा धुर्वे, डॉ. चंदू पोपटकर, डॉ. श्रीकांत भोवते, डॉ. शालिनी लिहीतकर हे निवडून गेले. तसेच प्रवीणा खोब्रागडे यांची बिनविरोध निवड झाली. मतांचे विभाजन टळल्याने हे यश मिळाल्याचे डॉ. मेश्राम यांनी म्हटले आहे.
‘नुटा’ला दोन जागांवर यश
प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी कायम रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई देणाऱ्या नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असो. ‘नुटा’ला यंदाच्या निवडणुकीमध्येही मागील वर्षीच्याच डॉ. कोंगरे आणि डॉ. जाचक यांच्याच जागांवर विजय मिळवता आला आहे. यावर्षी ‘नुटा’ने शिक्षक गटात चांगली लढत दिली असली, तरी अपेक्षित यश मिळवता आले नाही.
- महाआघाडी बरोबरीत असल्याचा दावा
सिनेटच्या निवडणुकीत महाआघाडी व शिक्षण मंच बरोबरीत असल्याचा दावा महाआघाडीचे डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे.