कोट्यवधींच्या खरेदीची गुढी, बाजारपेठेत नवचैतन्य; सर्वच शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 9, 2024 09:00 PM2024-04-09T21:00:22+5:302024-04-09T21:00:40+5:30
घर, वाहने, सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री
नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत नवचैतन्य दिसून आले. अनेकांनी या मुहूर्ताचा योग साधत खरेदीला प्राधान्य दिल्याने सराफा मार्केट, बांधकाम व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, आणि दुचाकी व चारचाकी वाहनांच्या क्षेत्रात गुढीपाडव्याच्या औचित्याने प्राथमिक अंदाजानुसार ५०० हून अधिक कोटींच्या आर्थिक उलाढालीची नोंद झाली. घराघरांतील मांगल्याच्या गुढीसोबत पाडव्यानिमित्त झालेल्या खरेदीची गुढीही उंचच राहिली. व्यापारी, व्यावसायिक आणि वितरकांनी दिलेल्या विविध ऑफर्समुळेही खरेदीचा उत्साह दुणावल्याचे चित्र बाजारपेठेत दिसले.
दरवाढीनंतरही सोने-चांदीची विक्री वाढली
सोने-चांदीचे दर वाढत असतानाही गुढीपाडव्याला ग्राहकांनी दौन्ही मौल्यवान धातूंची विविध स्वरूपात मोठ्या प्रमाणात खरेदी केली. नागपुरात ४० मोठ्या आणि २ हजारांहून अधिक मध्यम-लहान शोरूम असून सर्वच ठिकाणी गर्दी होती. सोन्याचे भाव जीएसटीसह ७५ हजारांवर गेल्यानंतरही ७५ ते १०० कोटींच्या उलाढालीचा अंदाज नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी व्यक्त केला. असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी यंदा गुढीपाडव्याला ग्राहकांनी सोने-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे सांगितले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल वाढली.
७०० चारचाकी व एक हजार दुचाकीची डिलेव्हरी
गुढीपाडव्यानिमित्त ऑटोमोबाईल क्षेत्रातही उत्साह दिसून आला. दोन हजारांहून अधिक दुचाकी, चारचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. गाडी घरी नेण्यासाठी ग्राहकांची सर्व शोरूममध्ये गर्दी होती. या दिवशी १५० कोटींच्या उलाढालीचा अंदाज आहे. अरूण मोटर्स प्रा.लि.चे करण पाटणी म्हणाले, गुढीपाडव्याला शोरूममधून २०० कारची डिलिव्हरी दिली. मारुतीच्या चार डीलर्सच्या माध्यमातून जवळपास ५०० कार विकल्या गेल्या. जयका मोटर्सचे महाव्यवस्थापक दीपलक्ष्मी खेडकर म्हणाले, जयका मोटर्सच्या नागपुरातील शोरूममधून १०० हून अधिक कारची डिलिव्हरी दिली. पाटणी बजाजचे नरेश पाटणी म्हणाले, ४० मोटरसायकल आणि १२० चेतक इलेक्ट्रिक स्कूटरेटची डिलिव्हरी देण्यात आली. मार्चमध्ये १५०० इलेक्ट्रिक स्कूटरेटची विक्री झाली होती.
७०० ते ८०० फ्लॅटचे बुकिंग
गुढीपाडव्याला नागपुरात ७०० ते ८०० फ्लॅटचे बुकिंग झाल्याची माहिती क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष गौरव अगरवाला यांनी दिली. नागपुरात २ हजारांहून अधिक प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. विशेष ऑफर्स आणि विविध बँकांचे व्याजदर ८.२ ते ८.६ टक्क्यादरम्यान असल्याचा फायदा या क्षेत्राला मिळत आहे. बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठी मागणी
गुढीपाडव्यानिमित्त इलेक्ट्रॉनिक्स बाजारातदेखील एलईडी टीव्ही, फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीनसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी चांगली गर्दी होती. मोबाईल आणि लॅपटॉप खरेदीसाठी युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे श्रीकांत भांडारकर म्हणाले, यंदा नागपुरात जास्त किमतीच्या वस्तूंना मागणी होती. सर्वच कंपन्यांच्या वस्तू विकल्या गेल्या. टावरी मार्केटिंगचे संतोष टावरी म्हणाले, गेल्यावर्षीच्या तुलनेत ४० टक्के जास्त उलाढाल झाली. शोरूममध्ये खरेदीसाठी गर्दी होती.