मूख पूर्वकर्करोगाचे निदान, उपचार होणार अधिक सोपे
By सुमेध वाघमार | Published: August 25, 2023 06:20 PM2023-08-25T18:20:18+5:302023-08-25T18:21:37+5:30
नागपूरचे शासकीय दंत रुग्णालय मध्यभारतात ठरणार ‘मॉडेल’
नागपूर : सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ, जाहिरातींचा प्रभाव आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे शालेयसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने मुख पूर्वकर्करोगाचे वेळीच निदान व उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणाची सोय उभी केली आहे. शुक्रवारी याचे लोकार्पण करण्यात आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुपारी रुग्णालयाला भेट देत ‘टोबॅको सीजेशन सेंटर’, ‘सेंटर ऑफ एक्सेलेन्स फॉर ओरल प्रिकॅन्सर कँसर’ तसेच ‘सेंटर ऑफ एक्सेलेंस फॉर रिजनरेटिव्ह पेरिओडांटोलॉजी’चे उद्घाटन केले. यावेळी मंचावर माजी आ. आशिष देशमुख, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, डॉ. मंजुषा वºहाडपांडे उपस्थित होते. संचालन डॉ. वैभर कारेमोरे यांनी केले. कार्यक्रमात माजी अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
- प्रत्येक गावात ‘डेंटिस्ट’ची गरज
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, तंबाखुच्या वाढत्या व्यसानामुळे मुखाचे आजार वाढत आहे. मुखाचा आजाराचे वेळीच निदानासाठी प्रत्येक गावात डेंटिस्टची गरज आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने मुख पूर्वकर्करोगाचे निदान व उपचारासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. कॅन्सरवरील उपचारासाठी स्वदेशी उपकरणाचा निर्मितीसाठी सरकार प्रयत्नशील आहे.
- मुखाचा कॅन्सरवर ‘सीओटू’ उपचार पद्धती ठरणार वरदान
‘सेंटर आॅफ एक्सेलेन्स फॉर ओरल प्रिकॅन्सर, कॅन्सर’मधील ‘ओटू’ उपचार पद्धतीमार्फत मूख पूर्व कॅन्सर व मूखाचा कॅन्सरवर उपचार करणे शक्य झाले आहे. २० मिनीटांत टाकेरहित लेझर उपचारामुळे पंधरा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो. विभागप्रमुख डॉ.प्रशांत पंडलीवार यांनी, सांगितले की मुखकर्करोगाच्या रुग्णांसाठी हे उपकरण वरदान आहे.
- मिनीटांत कळेल व्यसन सुटले की नाही
दंत रुग्णालयाच्या तळमजल्यावरच तंबाखू व्यसन मुक्ती केंद्र सुरू करण्यात आले. ओरल मेडिसीन अॅण्ड रेडिओलॉजी विभागच्या प्रमुख डॉ. अशिता कळसकर यांनी सांगितले, या केंद्रातील ‘कार्बन मोनोक्साईड (सीओ) मॉनिटर’च्या उपकरणाच्या सहाय्याने व्यक्तीच्या व्यसनाच्या प्रमाणाबाबत माहिती काही मिनीटांत मिळते.
- दातांचे कृत्रिम हाड तयार करणे अधिक सोपे
दंत परिवेष्टन शास्त्र विभागाचे डॉ. विवेक ठोंबरे म्हणाले, हिरड्यांच्या आजारामुळे दातांच्या हाडाची झीज होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय, अनेकवेळा कृत्रिम दाताचे रोपण करण्यासाठी पुरेसे हाड उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण होतात. यावरील उपचार व संशोधनासाठी ‘सेंटर ऑफ एक्सेलेंस फॉर रिजनरेटिव्ह पेरिओडांटोलॉजी’ विभाग स्थापन करण्यात आले. या विभागांतर्गत दातांचे कृत्रिम हाड निर्मिती करणे शक्य होईल. राज्यात अशाप्रकारचे हे पहिलेच केंद्र आहे.