सिंगापुरच्या सोयाबीन व्यापाऱ्याची नागपुरातील ठकबाजांकडून १.५६ कोटींनी फसवणूक
By योगेश पांडे | Published: August 17, 2023 04:56 PM2023-08-17T16:56:14+5:302023-08-17T16:57:22+5:30
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : सिंगापूर येथील एका सोयाबीन व्यापाऱ्याची नागपुरातील महिला-पुरुषांकडून १.५६ कोटींनी फसवणूक करण्यात आली. आरोपींनी व्यापाऱ्याकडून सोयाबीन बोलवून त्याची सांगलीत विक्री केली. मात्र त्याचा एक रुपयादेखील सिंगापूरच्या व्यापाऱ्याला दिला नाही. गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली.
सुजाता मालेवार (३८) व साईकुमार जयकांत जयस्वाल (सुभाष मार्ग, कॉटन मार्केट) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी ४ सप्टेंबर २०२१ रोजी सिंगापूर येथील व्यापारी दुर्गेशकुमार श्रीगोपाल नागोरी (५३) यांच्याकडून २१० मेट्रीक टन सोयाबीन मागविले. भारतीय चलनात त्याची किंमत १.५६ कोटी रुपये इतकी होती. याबाबत करारदेखील करण्यात आला. नागोरी यांनी कार्गोच्या माध्यमातून मुंबईत माल पाठविला. फेब्रुवारी २०२२ मध्ये आरोपींनी तेथून माल ताब्यात घेतला व सांगली एमआयडीसी येथील एका कंपनीला विकला.
करारानुसार मालाच्या विक्रीनंतर नागोरी यांना आरोपींनी पैसे देणे क्रमप्राप्त होते. मात्र आरोपींनी त्यांना एकही रुपया पाठविला नाही. नागोरी यांच्या कंपनीने वारंवार आरोपींना फोन केले. मात्र प्रत्येकवेळी काही ना काही कारण सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर नागोरी यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सुजाता मालेवार व जयस्वालविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.