एकीकडे नापिकी दुसरीकडे कर्जवसुलीचा तगादा; अल्पभूधारक शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 02:44 PM2023-01-28T14:44:47+5:302023-01-28T14:46:08+5:30
महेंद्री येथील घटना
जलालखेडा (नागपूर) : अति मुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि कर्जवसुलीचा वाढलेला तगादा यामुळे चिंताग्रस्त असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले. त्यांचा प्रजासत्ताक दिनी (गुरुवार, दि. २६) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्री येथे घडली.
रमेश गोविंद काळे (५०, रा. महेंद्री, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रमेश काळे यांच्याकडे महेंद्री शिवारात दीड एकर (६५ आर) शेती आहे. ते याच शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पत्नी व दाेन मुलांचा उदरनिर्वाह करायचे. त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या जलालखेडा शाखेकडून १ लाख ५० हजार रुपयांचे पीककर्ज तसेच खासगी बॅंकेकडून शेतीच्या कामासाठी कर्ज घेतले हाेते. गेल्या खरीप हंगामात काेसळलेल्या अति मुसळधार पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने ते कर्ज परतफेडीबाबत चिंतित हाेते. त्यातच खासगी बॅंकेचा कर्जवसुलीचा तगादा वाढला हाेता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
दरम्यान त्यांनी मंगळवारी (दि. १७) सकाळी शेतात विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांना जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. प्रकृती गंभीर असल्याने प्रथमाेपचार करून त्यांना नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जलालखेडा पाेेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
वर्षभरातील १२ वी आत्महत्या
नरखेड तालुक्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना. सन २०२१ मध्ये तालुक्यात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नवीन वर्षातील ही पहिली तर मागील सहा महिन्यांतील सहावी आत्महत्या हाेय. मागील काही वर्षांपासून तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान हाेत असताना राज्य सरकारच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययाेजना करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.