शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोधमोहीम
By आनंद डेकाटे | Published: August 24, 2023 01:40 PM2023-08-24T13:40:51+5:302023-08-24T13:41:25+5:30
३१ ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण
नागपूर : राज्यात कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होते. विविध कारणांमुळे होणाऱ्या स्थलांतरामुळे कामगारांची बालके शाळाबाह्य होत असतात. या शाळाबाह्य होणाऱ्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे ३१ ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण राबविण्यात येणार आहेत.
या संदर्भात जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा यांनी या संदर्भात आढावा बैठक घेतली. विशेष शोध मोहिमेतून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्वेक्षणात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महिला व बालविकास विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, साखर आयुक्तालय, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या सर्व विभागांची जबाबदारी शासन स्तरावरून निश्चित करण्यात आली असून सर्वेक्षणाच्या संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा या समितीच्या सहअध्यक्ष आहेत.