अयोध्येत जाणाऱ्या लाकडांवर नागपुरात होणार ‘सिझनिंग’ची विशेष प्रक्रिया
By योगेश पांडे | Published: March 30, 2023 07:45 AM2023-03-30T07:45:00+5:302023-03-30T07:45:01+5:30
Nagpur News अयोध्येतील राममंदिरासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या जंगलातील लाकूड हे थेट अयोध्येला न नेता त्यावर अगोदर नागपुरात प्रक्रिया करण्यात येणार आहे.
योगेश पांडे
नागपूर : अयोध्येतील राममंदिरासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या जंगलातील लाकूड रामनवमीच्या पुर्वसंध्येला चंद्रपूरहून भव्य सोहळ्यात निघाले. संबंधित लाकूड हे थेट अयोध्येला न नेता त्यावर अगोदर नागपुरात प्रक्रिया करण्यात येणार आहे. ‘सिझनिंग’ या प्रक्रियेदरम्यान लाकडांमधील ओलावा दूर करण्यात येणार आहे. त्यामुळे सागवानाच्या लाकडाचा दर्जा आणखी वाढणार असून पाऊस, ऊन, वारा, कीड यांचा प्रभाव जाणवणार नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातून रवाना होणारे लाकूड थेट अयाेध्येला न नेता प्रथम नागपूरला आणण्यात येणार असून येथे लाकडावर प्रक्रिया करून त्यातील अनावश्यक पाणी बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर सदर सागवान लाकूड हैदराबाद किंवा गुजरात येथे नेल्यानंतर त्या ठिकाणी नक्षीकाम करण्यात येणार आहे. त्यानंतर शेवटी हे लाकूड अयाेध्या येथे नेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वसाधारणत: जंगलातून आलेल्या सागवानाच्या लाकडांमध्ये एक नैसर्गिक ओलावा असतो. या लाकडातील हा ओलावा काढण्यासाठी ‘सिझनिंग’ ही प्रक्रिया करावी लागते. हा ओलावा तसा नैसर्गिक पद्धतीनेदेखील जाऊ शकतो. मात्र त्यासाठी बराच काळ प्रतिक्षा करावी लागते. अयोध्येतील मंदिराच्या कामाचे महत्त्व लक्षात घेता ‘सिझनिंग’ करण्यात येणार आहे.
काय असते ‘सिझनिंग’ ?
- ‘सिझनिंग’ला एकाप्रकारे लाकूड वाळविणे असे म्हणता येईल. या प्रक्रियेतून लाकडातील ओलावा दूर करण्यात येतो.
‘सिझनिंग’ची उद्दीष्ट्ये
- लाकडाचे वजन कमी करणे
- सागवानाच्या लाकडातील ओलावा दूर करणे
- रंगकाम व नक्षीकामासाठी लाकडाला आणखी सुरक्षित बनवणे
- ‘डायमेन्शनल स्टॅबिलिटी’ वाढविणे
- लाकडाची क्षमता वाढिणे
- डाग किंवा किडीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी
- तडा जाण्याची प्रवृत्ती घटविणे
‘सिझनिंग’ प्रक्रियेचे प्रकार
- ‘एअर सिझनिंग’ : या प्रक्रियेत हवेचा उपयोग करून लाकडातील ओलावा दूर करण्यात येतो. ही पारंपारिक पद्धत आहे.
- ‘सिझनिंग (बॉइलिंग) : या प्रक्रियेत उकळत्या पाण्यात सागवानाचे लाकूड टाकण्यात येते व त्यानंतर वाळविण्यात येते.
- ‘सिझनिंग (स्टिमिंग) : या प्रक्रियेत गरम वाफेचा उपयोग करण्यात येतो.
- ‘सिझनिंग (केमिकल) : या प्रक्रियेत क्षारयुक्त रसायनांचा उपयोग करून लाकडातील ओलावा दूर करण्यात येतो.
- ‘सिझनिंग (हॉट एअर) : या प्रक्रियेत मोठ्या चेंबरमध्ये लाकूड ठेवून गरम हवेचा मारा करून ओलावा दूर करण्यात येतो.
- ‘सिझनिंग (इलेक्ट्रीकल) : या प्रक्रियेत वीजेचा वापर करून लाकडातील ओलावा हटविण्यात येतो.