नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दिव्यांगांच्या सेवेत रुजू झाली जिना चढणारी खुर्ची
By सुमेध वाघमार | Published: March 18, 2023 08:00 AM2023-03-18T08:00:00+5:302023-03-18T08:00:07+5:30
Nagpur News रुग्णालयांमधील व्हिलचेअर, स्ट्रेचर ही नावे आपण ऐकली असेल, परंतु आता ‘स्टेअरकेस क्लाइंबिंग वॉल चेअर’ म्हणजे जीना चढणारी खुर्ची आली आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : रुग्णालयांमधील व्हिलचेअर, स्ट्रेचर ही नावे आपण ऐकली असेल, परंतु आता ‘स्टेअरकेस क्लाइंबिंग वॉल चेअर’ म्हणजे जीना चढणारी खुर्ची आली आहे. एका दिव्यांग व्यक्तीने मेडिकलमध्ये येणाऱ्या दिव्यांगांसाठी ही खुर्ची उपलब्ध करून दिली आहे. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मेडिकलच्या ओपडीमध्ये राेज अडीच हजारांवर रुग्ण येतात. येथून पहिल्या मजल्यावर ‘फिजिओथेपरी’, ईएनटी विभाग, लसीकरण, ‘एआरटी’ सेंटर आहे. विशेषत: ‘फिजिओथेरपी’साठी येणारे बहुसंख्य रुग्णांना पायऱ्या चढणे कठीण जाते. यामुळे अनेकदा रुग्णांच्या नातेवाईक त्यांना उचलून घेऊन जातात. विशेष म्हणजे, पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून ती बंद पडली आहे. डॉ. राज गजभिये यांच्याकडे अधिष्ठाता पदाची जबाबदारी येताच त्यांनी या लिफ्टच्या दुरुस्तीचा मंजुरीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. परंतु ते दुरुस्त होईपर्यंत मोठा कालावधी लागणार आहे. याची दखल एका दिव्यांग व्यक्तीने घेतली. त्यांनी जीना चढणारी खुर्ची व ती चालवण्यासाठी एक व्यक्ती उपलब्ध करून दिली.
-दीड लाखाची खुर्ची
‘स्टेअरकेस क्लाइंबिंग वॉल चेअर’ची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. ही चेअर चालविण्यासाठी त्या दिव्यांग व्यक्तीने एका कर्मचाऱ्याला ठेवले आहे. हा कर्मचारी दिव्यांग रुग्ण किंवा जीना चढता न येणाऱ्या रुग्णांना या खुर्चीवर बसवतो आणि थेट पायऱ्यांवरून ही खुर्ची चालवून त्यांना पहिल्या मजल्यावर पोहोचवतो. यात रुग्णाला कोणताही धक्का किंवा त्रास होत नाही.
-दिव्यांग व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, हा प्रयत्न
ही अनोखी खुर्ची उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, मी स्वत: दिव्यांग आहे. व्हिलेचअरवर माझे आयुष्य आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या अडचणीची जाणीव आहे. एकदा मेडिकलला आलो असताना लिफ्ट बंद असल्याने दिव्यांग रुग्णांचा समस्या पाहिल्या आणि ‘स्टेअरकेस क्लाइंबिंग वॉल चेअर’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हे एक छोटीशी समाजसेवा आहे. जीना असल्याने कोणी दिव्यांग व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, एवढाच उद्देश आहे.