छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा विद्यापीठ परिसरात उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 10:18 PM2023-06-14T22:18:40+5:302023-06-14T22:19:04+5:30
Nagpur News छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग स्थित जागेवर उभारला जाणार आहे.
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग स्थित जागेवर उभारला जाणार आहे. विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारणार आहे. येत्या १८ जून रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष मुधोजी राजे भोसले यांनी बुधवारी पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. उदयनराजे भोसले, प्रिंस शिवाजी राजे भोसले (तंजावर) हे प्रमुख अतिथी राहतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी राहतील. यासोबतच सर्व लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय नेतेही प्रामुख्याने उपस्थित राहतील.
यावेळी स्मारक समितीचे उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, सचिव मंगेश डुके, पदसिद्ध सदस्य डॉ. मंगेश पाठक, कोषाध्यक्ष विजय शिंदे, प्राचार्या डॉ. प्रवीणा खोब्रागडे उपस्थित होते.
- असा असेल पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची लांबी २० फूट, रुंदी १५ फूट असून उंची ९ फूट आहे. सिंहासनारूढ पुतळ्याची उंची ३२ फूट असून त्यावरील छत्र ७ फूट आहे. एकूण या पुतळ्याची उंची ५१ फूट राहील. ब्रान्झ धातूने बनविण्यात येणाऱ्या पुतळ्याचे वजन १०,००० किलोग्रॅम असेल. पुतळा मूर्तिकार सोनल कोहाड साकारणार आहेत.