८० घरफोड्या-चोरी करणारा अट्टल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात
By योगेश पांडे | Published: May 2, 2024 12:13 PM2024-05-02T12:13:01+5:302024-05-02T12:15:33+5:30
Nagpur : वायर्सचे बंडल चोरण्याच्या गुन्ह्यात अटक अन ९ गुन्हे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका कंस्ट्रक्शन साईटवरून वायर्सची बंडले चोरणाऱ्या आरोपीला अटक केल्यावर चौकशीअंती तो अट्टल घरफोड्या असल्याची बाब समोर आली. त्याने नऊ गुन्हे केल्याची कबुली दिली. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
११ एप्रिल रोजी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिलटॉप येथे राजेश बोदले यांच्या घराच्या बांधकाम साईटवरून ८१ हजार रुपये किंमतीची वायर्सची बंडले गायब झाली. अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हेशाखेच्या पथकाकडून याचा समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून योगेश उर्फ लक्की रमेश शाहू (२५, काशीबाई देऊळजवळ, कोतवाली) याला ताब्यात घेतले. त्याने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आणखी गुन्हे केल्याचीदेखील माहिती दिली.
शुभम उर्फ पांड्या अरुण ठाकरे (२५, यवतमाळ) याच्या मदतीने जरीपटका व कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याचे त्याने सांगितले. तसेच बजाजनगर व धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदाबाई तुकाराम देवगडे (मटकीपुरा, ईमामवाडा) व भारत चौकातील कबाडी दुकानदार राकेश शाहू याच्यासह मिळून घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली. याशिवाय अमोल तुकाराम देवगडे (मटकीपुरा, ईमामवाडा) याच्या साथीने बेलतरोडीत एक व अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडी केल्याची त्याने माहिती दिली. आरोपी लक्की हा अट्टल घरफोड्या असून त्याच्यावर नागपुरातच ८० हून अधिक घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. संबंधित नऊ गुन्ह्यातील ३.९४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हेशाखेने त्याला अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हवाली केले आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, नवनाथ देवकाते, ईश्वर खोरडे, मिलिंद चौधरी, मुकेश राऊत, प्रवीण लाडे, अमोल जासुद, अनुप तायवाडे, विनोद गायकवाड, संतोष चौधरी, मनिष रामटेके, अनिल बोटरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.