भर बाजारात चाकू घेऊन विद्यार्थ्याचा पाठलाग, जीवे मारण्याची धमकी
By योगेश पांडे | Published: November 2, 2023 05:40 PM2023-11-02T17:40:58+5:302023-11-02T17:41:44+5:30
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : अवघ्या २०० रुपयांवरून झालेल्या वादानंतर एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली व त्यानंतर भर बाजारात चाकू घेऊन वार करण्यासाठी त्याचा पाठलाग करण्यात आला. वेळीच बाजारातील लोक गोळा झाल्याने पुढील घटना टळली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
चैतन्य असे संबंधित १८ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कुणाल बल्की (२१, भिमसेना नगर झोपडपट्टी) याच्यासोबत इव्हेंट कॅटरिंगचे काम करतो. विद्यार्थ्याने दोन दिवसांअगोदर कुणालला केलेल्या कामाचे दोनशे रुपये मागितले. यावर कुणाल संतापला. गाडीच्या हफ्त्याचे पैसे द्यायचे असल्याने तुला पैसे देणार नाही असे म्हणत त्याला मारहाण केली. त्यानंतर दुपारी विद्यार्थी वडिलांच्या भाजीचे दुकान लावण्यासाठी मंगळवारी बाजारात गेला होता. तेथे कुणाल दारूच्या नशेत आला. त्याच्यासोबत आकाश बोपचे (२०, समता नगर), अक्षय देशभ्रतार (२३, भिमसेना नगर) व आशू (२१, भिमसेना नगर) हेदेखील होते. त्यांनी विद्यार्थ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कुणालने खिशातून चाकू काढला व तो घेऊन भर बाजारात विद्यार्थ्याच्या मागे धावला.
विद्यार्थी जीवाच्या आकांताने पळाला. आरडाओरड ऐकून लोक एकत्रित आले व त्यांना पाहून कुणालने चाकू तेथेच टाकून पळ काढला. हा प्रकार झाल्यानंतर संबंधित विद्यार्थी थेट जरीपटका पोलीस ठाण्यात गेला व त्याने चारही आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.