हृदयद्रावक...मावशीकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा लोखंडी गेट पडून मृत्यू
By योगेश पांडे | Published: November 22, 2023 04:38 PM2023-11-22T16:38:59+5:302023-11-22T16:44:02+5:30
खेळताना घडली घटना : बोबडे बोल नेहमीसाठी हरविले, एका क्षणात झाले होत्याचे नव्हते
नागपूर : मावशीकडे राहण्यासाठी आलेल्या एका तीन वर्षीय चिमुकलीचा खेळता खेळता लोखंडी गेट अंगावर पडून मृत्यू झाला. अगदी काही वेळेअगोदर बोबडे बोल बोलत मोठ्या भावासोबत खेळणाऱ्या चिमुकलीचे बोल नेहमीसाठीच हरविले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली.
यज्ञा शरद भाजीखाये (३, गिदमड, आडेगाव, हिंगणा) असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. ती तिची आई व मोठा भाऊ कौस्तुभ (५ वर्ष) यांच्यासोबत तिच्या मावशीकडे राहण्यासाठी आले होते. बोखारा येथील बजरंग नगरातील साईप्रसाद सोसायटी येथे तिची मावशी व तिचे पती मनोज प्रल्हाद गजभिये (५५) हे राहतात. गजभिये यांच्या घरी नवीन स्लायडर गेटचे काम सुरू होते. त्यासाठी लोखंडी गेट ठेवले होते.
मंगळवारी सायंकाळी यज्ञा व कौस्तुभ हे दोघेही अंगणात खेळत होते. खेळताना त्यांच्या अंगावर लोखंडी गेट पडले. गेटचे वजन खूप जास्त असल्याने दोघांनाही उठण्याची संधीच मिळाली नाही. त्यांच्या किंकाळ्या ऐकून त्यांची आई, मावशी व इतर नातेवाईक धावत बाहेर आले. काही वेळ अगोदरपर्यंत हसतखेळत बागडणाऱ्या दोन्ही चिमुकल्यांना अशा अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी गेट बाजुला गेले. यज्ञाच्या डोक्याला जबर मार बसला होता, तर कौस्तुभदेखील जखमी झाला होता. यज्ञाला उपचारासाठी एका खासगी इस्पितळात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गजभिये यांनी दिलेल्या सुचनेनुसार कोराडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबियांना मोठा धक्का
दिवाळीनंतर आईसह यज्ञा मावशीकडे आली होती. दोन्ही भाऊबहिणींच्या बाललीला पाहून नातेवाईकदेखील उत्साहात होते. काही दिवसांअगोदरच यज्ञाने कौस्तुभला भाऊबीजेनिमित्त ओवाळलेदेखील होते. मात्र तिच्या मृत्यूमुळे तिचा भाऊ, आई व नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.