रोजगारासाठी तरुणांवर कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2022 07:07 PM2022-12-31T19:07:58+5:302022-12-31T19:12:19+5:30
Nagpur News सुरक्षा रक्षकांच्या नोकरीसाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या युवकांवर गारठलेल्या थंडीत रात्री फूटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे.
नागपूर : परमाणू खनिज निदेशालयातर्फे नागपुरात सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर राबविली जात आहे. या भरतीसाठी उत्तर प्रदेशातून शेकडो युवक रोज येताहेत. हे युवक नागपुरातील गारठलेल्या थंडीमध्ये फुटपाथवर रात्र काढत आहे. सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी उत्तर प्रदेशातून युवकांना बोलावून त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था न करता त्यांना थंडीत कुडकुड ठेवण्याचा हा प्रकार वेदनादायी आहे.
शुक्रवारी मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या या युवकांशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला. थंडीत कुडकुड पडलेले हे युवक खाली प्लास्टिकचे बॅनर, एखादी चादर टाकून अंगावर ब्लँकेट ओढून झोपलेले होते. त्यांना फुटपाथवर झोपण्यामागचे कारण विचारल्यावर म्हणाले की उद्या सुरक्षा रक्षकाची भरती आहे. आम्ही उत्तर प्रदेशातून आलो आहे. सकाळी येथे शारीरिक चाचणी आहे. म्हणून फुटपाथवर झोपलो आहे. ही कायमस्वरूपी नोकरी असल्याचे हे युवक म्हणाले. युवकांना प्रात:विधी, जेवणासंदर्भात विचारल्यावर म्हणाले की, अशी कुठलीही सोय येथे नाही. प्रात:विधी सुलभ शौचालय आहे तेथे करतो. जेवणाचीही सोय स्वत:च केली आहे. या युवकांनी योगी सरकारवरही ताशेरे ओढले. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. रोजगाराच्या संधीच नसल्याने आम्हाला नागपुरात येऊन सुरक्षा रक्षकाच्या भरतीसाठी यावे लागले. थंडीच्या दिवसात रस्त्याच्या फुटपाथवर या युवकांनी रात्र काढली, हा प्रकार त्यांच्या आरोग्यासाठी व जीवासाठी धोकादायक आहे. परिसरात काही सभागृह आहे. तिथे त्यांच्या राहण्याची सोय करता आली असती.
- भरती प्रक्रिया राबविताहेत की वाईट कामे करताहेत
सकाळी भरती प्रक्रिया सुरू असताना, या मुलांच्या बाबतीत विचारणा करण्यासाठी लोकमत प्रतिनिधी गेले होते. मैदानावर सुरू असलेल्या शारीरिक कसरतीचे काही फोटो काढत असताना, सुरक्षा रक्षकाने मज्जाव केला. भरती प्रक्रियेतील अधिकारी त्यावेळी आले. मोबाईलमध्ये काढलेले फोटो डिलीट करण्यास सांगितले. आमचा उद्देश भरती प्रक्रिया राबविणाऱ्यांनी रात्री फुटपाथवर झोपलेल्या युवकांसाठी कुठेतरी सोय करावी, अशी भावना होती. या भरती प्रक्रियेसंदर्भात स्थानिक पोलिस अथवा प्रशासनालाही जाणीव आहे की नाही, हा प्रश्नच आहे. अशात फुटपाथवर झोपलेल्या युवकांच्या आरोग्याशी कमीजास्त झाल्यास जबाबदारी कोण घेणार?