अमरावतीतून नागपुरात आलेला साहित्य संघ झाला अवघ्या विदर्भाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 04:10 PM2023-01-14T16:10:27+5:302023-01-14T16:11:27+5:30
शतकमहोत्सवाची पूर्तता : १९९२-९३ पासून वाङ्मय पुरस्कारांना सुरुवात
नागपूर : विदर्भसाहित्य संघ, केवळ नावच पुरे आहे... कारण, ‘विदर्भविषय: सारस्वतीजन्मभू:’ असे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या संघाच्या इतिहासात बऱ्याच घडामोडी विस्मयकारी आणि काळाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटकसंस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या शेऱ्याशिवाय महामंडळाचे कुठलेच निर्णय पुढे जाऊ शकत नाहीत किंवा झालेले निर्णय फिरवरण्यात आल्याचा इतिहास आहे. विदर्भातील सारस्वत मंडळींसाठी स्वत:ला वाहून घेणाऱ्या इतक्या ताकदीची ही संस्था आज शंभर वर्षे पूर्ण करत आहे. विशेष म्हणजे, हा इतिहासही रंजक आहे. मकरसंक्रमणाच्या मुहूर्तावर १४ जानेवारी १९२३ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने पहिली ३८ वर्षे कधीही वर्धापन दिवस साजरा केला नाही. नागपुरात संस्थेची इमारत तयार झाल्याने, तत्कालीन अध्यक्ष ना. रा. शेंडे यांच्या पुढाकाराने १९६१ मध्ये वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यास सुरुवात झाली आणि आज अव्याहतपणे ६२ वर्षे ही परंपरा सुरू आहे. १९९२-९३ पासून वाङ्मय पुरस्कारांना सुरुवात झाली आहे.
मार्चमध्ये सादर होणार ‘विदर्भातील नाट्यवाङ्मयाचा इतिहास’
- विदर्भ साहित्य संघाने गेल्या शंभर वर्षांत अनेक नवोदितांना जगापुढे आणले. त्यांच्या पुस्तकांना व्यासपीठ उपलब्ध करवून दिले. संघाच्या शतकपूर्तीच्या पर्वावर डॉ. विलास चिंतामण देशपांडे लिखित ‘विदर्भातील नाट्यवाङ्मयाचा इतिहास’ हा संशोधनात्मक ग्रंथ मार्चमध्ये प्रकाशित होण्याची शक्यता आहे. यासोबतच विदर्भ साहित्य संघाचा इतिहास, त्यातील रंजक घडामोडी, आदींवर आधारित साहित्यही याच काळात प्रकाशित होणार आहेत. विदर्भातील वाङ्मयाचा इतिहास, झाडीबोली कविता, साहित्य संघातील भाषणांचा संच जसाच्या तसा हेसुद्धा याच काळात प्रकाशित होणार आहेत.
स्थापना अमरावतीमध्ये, कार्यालय नागपुरात
- अण्णासाहेब खापर्डे यांनी अमरावतीमध्ये विदर्भातील सर्वांत जुन्या अशा या साहित्य संस्थेची स्थापना केली होती. त्यानंतर १९५० मध्ये संस्थेचे कार्यालय नागपुरात आणले गेले. सीताबर्डी, झांशी राणी चौक येथील पूर्वीचे धनवटे रंगमंदिर, हे विदर्भ साहित्य संघाचेच होते. १९९२-९३ मध्ये हे रंगमंदिर तोडून त्या जागी नवी बहुमजली वास्तू उभारण्यात आली आणि आता त्या वास्तूचे नाव विदर्भ साहित्य संघ सांस्कृतिक संकुल असेच आहे. या इमारतीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यांवर धनवटे रंगमंदिराच्या जागी रंगशारदा नावाचे रंगमंदिर उभे झाले आहे. रंगमंदिराचे हे नामकरण संघाचे अध्यक्ष स्व. मनोहर म्हैसाळकर यांच्याच इच्छेवरून झाले आहे.
वाङ्मय पुरस्कार चढत्या क्रमाने
- विदर्भ साहित्य संघाने १९९२-९३च्या सुमारास वाङ्मय पारितोषिके प्रदान करण्यात सुरुवात केली. प्रारंभी संशोधन, कथावाङ्मय अशा प्रकारामध्ये पुरस्कार प्रदान केले जात होते. त्यानंतर १९९५ मध्ये पारितोषिकांची संख्या वाढविण्यात आली. १९९८ मध्ये ग्रेसांना पहिला जीवनगौरव ‘जीवनव्रती’ हा पुरस्कार देण्यात आला होता.
विशेष म्हणजे, नागपूर आणि पुढे अमरावती विद्यापीठांतील पीएच.डी. पदवी धारण करणाऱ्यांचा सत्कार केला जात होता. सोबतच राज्य शासनाकडून वाङ्मय पुरस्कारप्राप्त विदर्भातील साहित्यिकांचाही सत्कार केला जात होता. असा सत्कार करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था होती. मात्र, कालांतराने हा सन्मान करणे बंद झाले.