नंदीबैल तान्हा पोळ्यातून चिमुकल्यांनी दिला भावस्पर्शी संदेश
By नरेश डोंगरे | Published: September 15, 2023 07:56 PM2023-09-15T19:56:40+5:302023-09-15T19:56:53+5:30
तान्हा पोळा उत्साहात साजरा
नागपूर : आकर्षक रंगभूषा, वेशभूषा करून आणि छोटे छोटे सजविलेले नंदीबैल घेऊन ठिकठिकाणीच्या चिमुकल्यांनी आज तान्हा पोळा साजरा केला.
सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू असल्यामुळे आजच्या तान्हा पोळ्याच्या उत्साहावर पाऊस पाणी फेरतो की काय, अशी शंका निर्माण झाली होती.
मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली आणि अनेक दिवसांपासून आपल्या नंदीबैलाला सजवून धजवून तयारीत असलेल्या बाळगोपाळांनी उत्साहात ठिकठिकाणीच्या तान्हा पोळ्यात आपले नंदी आणले. शहरातील विविध भागासह शताब्दी चौक, संकट मोचन हनुमान, मंदिर महापुष्प सोसायटीतील शिव मंदिराजवळ भव्य तान्हा पोळा भरला.
यात आकर्षक वेशभूषा करून अनेक चिमुकले सहभागी झाले होते. एका चिमुकलीने आपला छोटूकला नंदीबैल आणताना एक स्लोगनही लिहिले होते.
'मी आधी धष्टपुष्ट आणि डौलदार होतो. मात्र सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे सध्या माझी अशी अवस्था झाली' असे हे स्लोगन होते. या भावस्पर्शी संदेशाकडे पोळ्यात उपस्थित अनेकांचे लक्ष वेधले गेले होते.