तमालपत्राने भरलेला ट्रक पेटला; ओव्हरलोड होऊन विद्युत तारांचा झाला स्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 09:08 PM2023-03-11T21:08:54+5:302023-03-11T21:12:24+5:30
Nagpur News मसाल्यात वापरण्यात येणाऱ्या तेजपानाने (तमालपत्र) ओव्हरलोड भरलेल्या ट्रकला भंडारा रोडवरील मसाल्याच्या कंपनीजवळ आग लागली. अग्निशमन पथकाने अवघ्या दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळविले.
नागपूर : मसाल्यात वापरण्यात येणाऱ्या तेजपानने (तमालपत्र) ओव्हरलोड भरलेल्या ट्रकला भंडारा रोडवरील मसाल्याच्या कंपनीजवळ आग लागली. अग्निशमन पथकाने अवघ्या दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु या आगीत ३८ लाख रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. ओव्हरलोड भरलेल्या ट्रक विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने आग लागली असल्याचा अंदाज अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मसाले कंपनी, माँ उमिया धाम, नाकानंबर ५ भंडारा रोडवर शनिवारी दुपारी ३.२० वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला आगीची सूचना मिळाली. कळमना व लकडगंज अग्निशमन केंद्राचे सब ऑफिसर अशोक पोटभरे व अरुण कळमनकर यांच्या नेतृत्वात टीम घटनास्थळी पोहोचली. ट्रकमधून आगीचा चांगलाच भडका उडाला होता. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण ट्रकला अवाक्यात घेतले होते. संपूर्ण परिसरात आगीचा धुराळा चांगलाच पसरला होता. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. तरीही आगीत ट्रक व तेजपानाचा साठा जळाल्यामुळे ३८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आगीत जळालेल्या ट्रकचा क्रमांक एमएच-३०-बीडी ४४२२ आहे. ट्रक चालकाचे नाव अमजद खान आहे. अग्निशमन पथकाने दोन तासात आगीवर नियंत्रण मिळविले.