Nagpur: पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांकडून रेल्वेत शिस्तीचे अनोखे प्रदर्शन, कसलाही वाद नाही, कुठेही राडा नाही

By नरेश डोंगरे | Published: October 26, 2023 10:25 PM2023-10-26T22:25:54+5:302023-10-26T22:28:16+5:30

Nagpur: निळी टोपी, उपरणे अन् पंचशील ध्वज घेऊन तीन दिवसांत नागपुरात सुमारे पावणेदोन लाख भीमसैनिक आले. दीक्षाभूमीवर त्यांनी माथा टेकवला अन् वैचारिक सोने लुटले. पवित्र दीक्षाभूमीवरून समतेचा संदेश घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ते आले तसे निघूनही गेले.

A unique display of discipline in the railways by over two lakh Bhimas, no arguments, no outcry anywhere. | Nagpur: पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांकडून रेल्वेत शिस्तीचे अनोखे प्रदर्शन, कसलाही वाद नाही, कुठेही राडा नाही

Nagpur: पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांकडून रेल्वेत शिस्तीचे अनोखे प्रदर्शन, कसलाही वाद नाही, कुठेही राडा नाही

- नरेश डोंगरे 
नागपूर - निळी टोपी, उपरणे अन् पंचशील ध्वज घेऊन तीन दिवसांत नागपुरात सुमारे पावणेदोन लाख भीमसैनिक आले. दीक्षाभूमीवर त्यांनी माथा टेकवला अन् वैचारिक सोने लुटले. पवित्र दीक्षाभूमीवरून समतेचा संदेश घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ते आले तसे निघूनही गेले. एवढ्या मोठ्या संख्येत विविध मार्गाने येऊन कोणत्याच रेल्वेगाडीत अथवा रेल्वे स्थानकावर कसला राडा झाला नाही की कुणाचे काही चोरीला गेले नाही. विशेष म्हणजे, सलग ५०-५५ तासांचा या पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांचा बंदोबस्त रेल्वेच्या अवघ्या दीडशे पोलिस, जवानांनी सांभाळला.

रक्ताचा एकही थेंब न सांडवता अभूतपूर्व सामाजिक- वैचारिक क्रांती घडविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावण स्मृतींना नमन करण्यासाठी तसेच वैचारिक सोने लुटण्यासाठी दसऱ्याला दरवर्षी दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखो भीमसैनिक येतात. कुणी विमानाने, कुणी खासगी वाहनाने तर कुणी चक्क दुचाकींनी येथे येतात. प्रवासासाठी बाबांची सर्वाधिक लेकरं रेल्वे गाड्यांचा वापर करतात. दसऱ्याच्या एक दिवसांपूर्वीपासून ते दीक्षाभूमीवर दाखल होतात अन् दसऱ्याच्या दिवशी मुख्य कार्यक्रम संपला की, परतीची वाट धरतात. याही वर्षी सोमवारी २३ ऑक्टोबरपासून विविध रेल्वेगाड्यांनी त्यांचे नागपुरात आगमन सुरू झाले.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अहमदाबाद, पुरी, हावडा, गीतांजली, ज्ञानेश्वरी, महाराष्ट्र, विदर्भ, सेवाग्राम, दुरांतो, गरीब रथ या रेल्वेगाड्यांनी सर्वाधिक भीमसैनिक नागपुरात आले. विशेष म्हणजे, मुंबई ते नागपूर दोन आणि पुणे ते नागपूर एक अशा तीन स्पेशल ट्रेन भीमसैनिकांनी भरून नागपुरात आल्या. अर्थात २३ आणि २४ ऑक्टोबर या दोन दिवसांत सुमारे ८० ते ९० हजार प्रवासी नागपूरच्या मुख्य आणि अजनी रेल्वे स्थानकांवर उतरले. तेवढ्याच संख्येत २५ ऑक्टोबरच्या पहाटेपासून त्यांनी आपापल्या गावांचा मार्ग धरला. मात्र, एवढ्या प्रचंड संख्येत येणे-जाणे करणाऱ्या बाबांच्या या अनुयायांनी प्रवासादरम्यान कुठेही कसलीही अनुचित घटना घडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.

उल्लेखनीय असे की, गर्दी कशाचीही असो, बंदोबस्तासाठी पोलिसांचे प्रचंड मनुष्यबळ तैनात करावे लागते. २३, २४ आणि २५ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस प्रचंड गर्दी अनुभवणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर जीआरपी (लोहमार्ग)चे ४ अधिकाऱ्यांसह केवळ ८० पोलिस तर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) केवळ ६५ जवान बंदोबस्तासाठी तैनात होते.

एक सिंगल तक्रारही नाही!
या तीन दिवसांत एवढ्या प्रचंड प्रमाणात नागपूर स्थानकावर गर्दी होती. मात्र, कुठेच काही गडबड, गोंधळ झाला नाही. कुणाचे काही चोरीला गेले नाही किंवा काही हरवलेही नाही. आमच्याकडे एक सिंगलही तक्रार आली नाही, असे रेल्वेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा काशिद सांगतात.
 

Web Title: A unique display of discipline in the railways by over two lakh Bhimas, no arguments, no outcry anywhere.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.