जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर

By नरेश डोंगरे | Published: November 2, 2023 10:24 PM2023-11-02T22:24:15+5:302023-11-02T22:24:26+5:30

रोज आर्थिक फटका बसत असल्याने आली होती मरगळ : लालपरी शुक्रवार सकाळपासून पूर्ववत धावणार

A wave of joy in the ST Corporation due to the decision of Jarange Patil | जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर

जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर

नागपूर: रोजच्या रोज मोठा आर्थिक फटका बसत असल्याने अक्षरश: रडकुंडीला आलेल्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळात आज सायंकाळी अचानक उत्साहाची लहर धावली. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहिर करताच एसटीच्या अधिकाऱ्यांनी लगबगीने आपापल्या जिल्ह्यातील बस वाहतूक शुक्रवारी सकाळपासून पुर्ववत करण्याचे कनिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आणि राज्यातील विविध भागात आंदोलनाचे लोन पसरले. ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्याने आंदोलन चिघळतच गेले. या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका एसटी महामंडळाला बसला. शंभरावर बसेसची तोडफोड, जाळपोळ झाली. राज्यातील अनेक आगारातून विविध मार्गावर, विशेषत: मराठवाड्यात धावणाऱ्या एसटी बसेसची सेवा बंद झाली. परिणामी एसटी महामंडळाला रोज कोट्यवधींचा फटका बसू लागला. आधी कोरोना आणि नंतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी महामंडळ पुरते रडकुंडीला आले होते. आंदोलनाच्या धास्तीमुळे चाके फिरणे बंद झाल्याने महामंडळात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. रोजच मोठा आर्थिक फटका बसत असल्याने एसटी महामंडळाचा डोलारा कसा सांभाळयचा, कर्मचाऱ्यांचे पगार आणि एसटीचा ईतर खर्च कसा करायचा, असे प्रश्न महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शिर्षस्थ अधिकाऱ्यांना सतावत होते.

या प्रश्नांनी एसटीवर मरगळ आल्यासारखी झाली होती. मात्र, सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण मागे घेत असल्याच जाहीर केले आणि एसटी महामंडळात अचानक उत्साहाची लहर दाैडावी तसे वातावरण निर्माण झाले. अनेक अधिकाऱ्यांनी तडकाफडकी वरिष्ठांशी संपर्क साधत स्थानिक पातळीवर बंद पडलेल्या सर्व मार्गावरील एसटी बसच्या फेऱ्या शुक्रवार सकाळपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आपापल्या जिल्ह्यातील आगारांची व्यवस्था सांभाळणाऱ्यांना पाठविण्यात आला. त्यामुळे एसटी पूर्ववत सुरू करण्याच्या आदेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एसटीच्या चालक वाहकांमध्येही उत्साह संचारल्यासारखे झाले आहे.

आंदोलनाचा असा बसला फटका
मराठा आंदोलनात सुमारे १०० बसेसची तोडफोड आणि जाळपोळ झाली. त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेपाच ते सहा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या आंदोलनामुळे राज्यतील दोन-चार जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील विविध मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसच्या अनेक फेऱ्या थांबल्या.

सात जिल्हे, आर्थिक गणित गडबडले

आंदोलन तीव्र झाल्यामुळे मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. एसटीचे धावणे थांबल्याने आर्थिक तिजोरीवरही कोट्यवधींचा ताण पडला. एकूणच ऐन दिवाळी तोंडावर असताना एसटीचे आर्थिक गणित गडबडले.

विदर्भात असा झाला परिणाम
एसटी महामंडळाच्या विदर्भ विभागाला आंदोलनाचा फटका बसला. पंढरपूर - पुसद, छत्रपती संभाजीनगर - मालेगाव, छत्रपती संभाजीनगर -पुसद, छत्रपती संभाजीनगर - अकोला, सोलापूर-पुसद, पुणे -खामगाव (दोन फेऱ्या) आणि पुणे - अकोला (तीन फेऱ्या) या मार्गावरच्या २२ फेऱ्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे ८,३२५ किलोमिटरवरच्या मार्गावर प्रवास प्रभावित होऊन एसटीची कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले.

Web Title: A wave of joy in the ST Corporation due to the decision of Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.