फुकटात सिगारेट न दिल्याने महिलेसह भावावर जीवघेणा हल्ला; दुकानात लुटमार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 02:08 PM2023-02-20T14:08:33+5:302023-02-20T14:10:32+5:30
जरीपटकाच्या इंदोरा चौकातील घटना : आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : फुकटात सिगारेट न दिल्यामुळे आरोपींनी पानठेला चालविणारी महिला आणि तिच्या भावावर जीवघेणा हल्ला करून महिलेचा पानठेला व तिच्या भावाच्या पान मटेरियलच्या दुकानाची तोडफोड करून लुटमार केली. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंदोरा चौकात शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
प्रियश्री प्रदीप गायकवाड (३२, मॉडेल टाऊन, इंदोरा चौक) यांचे सोनू पान शॉप नावाचा पानठेला आहे. पानठेल्याच्या बाजूलाच त्यांच्या मोठ्या भावाचे पान मटेरियलचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी प्रियश्री आपल्या मोठ्या भावाला दुकानाकडे लक्ष देण्यास सांगून घरी गेल्या. तेवढ्यात कुख्यात आरोपी शंभू ऊर्फ ऋषिकेश रमेश गोवर्धन (३०, मायानगर, जरीपटका) हा प्रियश्रीच्या भावाच्या दुकानात आला. त्याने प्रियश्रीच्या भावाला सिगारेटचे पाकीट मागितले. पाकीट दिल्यानंतर प्रियश्रीच्या भावाने सिगारेटच्या पाकिटाचे पैसे मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला.
प्रियश्रीच्या भावाने पाकीट परत करण्यास सांगितले. त्यावर शंभूने शिवीगाळ करून ‘तू मेरे को पहचानता नहीं, तू शंभू से पैसे मांग रहा है, रुक थोड़ी देर में आकर तेरी दोनों दुकान फोडता हू’ असे म्हणून तेथून निघून गेला. काही वेळानंतर शंभू आपला साथीदार तन्मय ऊर्फ पोपो राजू जाधव (२५) सोबत तेथे परत आला. त्यांनी प्रियश्री व तिच्या भावाच्या दुकानातील सामानाची फेकफाक करून प्रियश्रीवर हल्ला केला. प्रियश्रीवर आरोपींनी हल्ला केल्याचे पाहून तिचा भाऊ मदतीसाठी धावला असता पोपोने त्याला जखमी केले. पोपोने बीअरच्या बाटलीने हल्ला करून प्रियश्रीला जखमी केले. त्याने खुनाच्या हेतूने बॉटल काउंटरवर फोडली. फुटलेली बॉटल घेऊन तो प्रियश्रीवर वार करीत होता. प्रियश्रीने स्वत:ला वाचविण्यासाठी पप्पूचे दोन्ही हात पकडले.
दरम्यान त्यांनी आरडाओरड केल्यामुळे नागरिक गोळा झाले. नागरिकांना पाहून पोपो आणि शंभू तेथून सिगारेटचे पाकीट घेऊन फरार झाले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोपो आणि शंभूविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांचीही जरीपटका ठाण्याच्या परिसरात दहशत आहे. जरीपटका पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.