‘पार्ट टाइम जॉब’च्या नावाखाली महिलेची १२ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2023 09:59 PM2023-05-15T21:59:55+5:302023-05-15T22:00:28+5:30
Nagpur News ‘पार्ट टाइम जॉब’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका महिलेची तब्बल १२ लाखांची फसवणूक केली. विविध ‘टास्क’च्या माध्यमातून आरोपींनी त्यांना जाळ्यात ओढले.
नागपूर : ‘पार्ट टाइम जॉब’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका महिलेची तब्बल १२ लाखांची फसवणूक केली. विविध ‘टास्क’च्या माध्यमातून आरोपींनी त्यांना जाळ्यात ओढले. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
कल्याणी शरद लाकडे (३४, महाल) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. १६ एप्रिल रोजी त्यांना अज्ञात व्यक्तीच्या मोबाइलवरून ‘पार्ट टाइम जॉब’साठी विचारणा झाली. हे काम ‘वर्क फ्रॉम होम’ असेल असा दावा आरोपींकडून करण्यात आला. कल्याणी यांनी त्यासाठी होकार दिला. आरोपींनी त्यांना चित्रपटांचे रेटिंग, फूड रेटिंग इत्यादी टास्क पूर्ण केल्यास बोनस मिळेल, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने लिंक पाठविली. कल्याणी यांनी संबंधित ‘लिंक’वर क्लिक करून आवश्यक माहिती भरली व आरोपींनी पाठविलेले टास्क पूर्ण केले. यावर आरोपींनी त्यांना बोनसची रक्कम दिली. यामुळे कल्याणी यांचा आरोपींवर विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले व त्यांना नफा होत असल्याचे चित्र दर्शविले.
टप्प्याटप्प्यात आरोपींनी १३ मेपर्यंत त्यांच्याकडून १२ लाख ८० हजार रुपये घेतले. मात्र, त्यातील एकही रुपया परत दिला नाही. कल्याणी यांनी आरोपीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कल्याणी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.