दारु विकणाऱ्या महिलेला सहा महिन्यांसाठी केले तडीपार
By दयानंद पाईकराव | Published: July 27, 2024 05:33 PM2024-07-27T17:33:25+5:302024-07-27T17:34:39+5:30
Nagpur : जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नागपूर : अवैधरित्या दारू विकणाऱ्या व प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तिच्या वागणूकीत बदल न झाल्यामुळे जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. लता संभाजी देशमुख (५५, रा. इंदिरा मठ मोहल्ला, आनंदनगर रोड, जरीपटका) असे तडीपार केलेल्या महिलेचे नाव आहे. ती अवैधरित्या दारु विकत होती.
सोबतच लोकांना दमदाटी करणे, मारहाण करणे आदी गुन्हे करीत असल्यामुळे परिसरात तिची दहशत निर्माण झाली होती. या महिलेविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तिच्या वागणुकीत कोणताही बदल झालेला नव्हता. त्यामुळे जरीपटकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी या महिलेला तडीपार करण्यासाठी झोन ५ च्या पोलीस उपायुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी हा प्रस्ताव पारीत केला. या महिलेला शुक्रवारी २६ जुले २०२४ रोजी मनसर रामटेक येथे तिच्या नातेवाईकांकडे सोडण्यात आले आहे. ही महिला शहरात आढळल्यास जरीपटका पोलिसांना किंवा नियंत्रण कक्षाला सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.