वाइनशॉपजवळ खाद्यपदार्थांची हातगाडी लावली म्हणून महिलेचा कानच फाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 08:50 PM2023-03-10T20:50:51+5:302023-03-10T20:51:31+5:30
Nagpur News वाइनशॉपजवळ खाद्यपदार्थांची हातगाडी लावली म्हणून वस्तीतीलच एका तरुणाने महिलेवर हल्ला करत तिचा कानच फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नागपूर : वाइनशॉपजवळ खाद्यपदार्थांची हातगाडी लावली म्हणून वस्तीतीलच एका तरुणाने महिलेवर हल्ला करत तिचा कानच फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
ललिता नामक महिलेने काही दिवसांपूर्वी रामेश्वरी चौकातील वाइनशॉपच्या शेजारीच खाद्यपदार्थांची हातगाडी लावली. गौरव हरले (२६, हावरापेठ) याने तिला न विचारता हातगाडी कशी काय लावली असे विचारत धमकी दिली होती. मात्र महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. गुरुवारी रात्री तो परत आला व त्याने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवाय हातगाडी न लावण्याबाबत परत धमकी दिली. महिलेने त्याला विरोध केला असता त्याने हातगाडीवरील सामान फेकले. त्यानंतर त्याने महिलेवर हल्ला करत तिला मारहाण केली तसेच डाव्या कानाला जोरात खेचले. यामुळे ‘इअररिंग’च्या जागेजवळ कान फाटला व रक्तस्त्राव सुरू झाला. हे पाहून गौरव तेथून पळून गेला. महिलेने पोलिसांना बोलावले. पोलिस घटनास्थळी आले व महिलेला मेडिकलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. तिच्या तक्रारीवरून आरोपी गौरवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.