आता हार्ट अटॅकचे निदान करणार मनगटावरील घड्याळ

By सुमेध वाघमार | Published: March 15, 2023 08:00 AM2023-03-15T08:00:00+5:302023-03-15T08:00:07+5:30

Nagpur News आता रक्त तपासणीशिवाय याचे निदान करणारे घड्याळ नागपूरचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी तयार केले आहे.

A wrist watch will now diagnose heart attacks | आता हार्ट अटॅकचे निदान करणार मनगटावरील घड्याळ

आता हार्ट अटॅकचे निदान करणार मनगटावरील घड्याळ

googlenewsNext

 

नागपूर : हृदयविकाराचा झटका आल्याने रक्तातील ‘ट्रोपोनिन’ची पातळी वाढते. याची तापसणी केल्यावरच ‘हार्ट अटॅक’चे निदान होते; परंतु आता रक्त तपासणीशिवाय याचे निदान करणारे घड्याळ नागपूरचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी तयार केले आहे. २३० रुग्णांवर त्याचे यशस्वी प्रयोग करून नुकतेच त्यांनी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत याचे सादरीकरणही केले.

हृदयविकाराच्या झटक्याच्या रुग्णांमध्ये ‘ट्रोपोनिन’ पातळीचे विश्लेषण करण्यासाठी सध्या रक्त तपासणी हाच एक पर्याय आहे. मात्र त्यात बराच वेळ जातो. मनगटावर घालता येणाऱ्या घड्याळासारख्या उपकरणाच्या माध्यमातून जर हृदयगती, ई.सी.जी. सुद्धा काढता येत असेल, तर ‘ट्रोपोनिन’ पातळीची माहिती का नाही, या विचारावर डॉ. सेनगुप्ता यांनी संशोधन सुरू केले. असेच एक उपकरण अमेरिकेतील एका फर्मकडून बनवून घेतले. या उपकरणाची चाचणी मागील वर्षभर पाच मोठ्या दवाखान्यांमध्ये सुरू होती. याचे ‘रिपोर्टस’ थेट अमेरिकेत कंपनीला जात होते. रक्त तपासणी आणि या उपकरणाच्या माध्यमातून केलेली तपासणी यांचे निकाल ९८ टक्के जुळले. यामुळे आता लवकरच ‘ट्रोपोनिन’ची पातळी शोधण्यासाठी आवश्यक असलेली रक्त तपासणी ही कालबाह्य होईल आणि काही वर्षांतच हे उपकरण त्याची जागा घेईल, असे डॉ. सेनगुप्ता यांचे म्हणणे आहे.

-अमेरिका, युरोपमध्ये घड्याळीचे स्वागत

डॉ. सेनगुप्ता यांनी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत या घड्याळाचे सादरीकरण केल्यानंतर युरोपमध्येही याचे स्वागत होत आहे. प्रत्येक देशातील स्थानिक कायद्यांना अनुसरून उपकरणाची स्टेज फोर चाचणी यशस्वी झाली की, याचे व्यावसायिक उत्पादन सुरू होईल, असेही डॉ. सेनगुप्ता म्हणाले. ही चाचणी मध्य भारतातील २३० हून अधिक रुग्णांवर करण्यात आली. डॉ. सेनगुप्ता यांच्यासह डॉ. महेश फुलवानी, डॉ. अजीज खान, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर व रायपूरचे डॉ. स्मित श्रीवास्तव या हृदयरोगतज्ज्ञांनी रुग्णांवर चाचण्या घेतल्या.

-रक्त तपासणीचा वेळ वाचेल

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीवास्तव म्हणाले की, मनगटात परिधान केलेले हे उपकरण ट्रोपोनिन पातळीचे विश्लेषण करीत असल्याने हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रक्त तपासणीसाठी लागणारा वेळ आणि मेहनत वाचेल. रुग्णांना तत्काळ उपचार मिळतील. रुग्णांचा जीव वाचण्याची शक्यता कित्येक पटीने वाढेल.

-ॲसिडिटी समजून हार्ट अटॅककडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी वरदान

अनेक लोक हृदयाची जळजळ, छातीत दुखणे ही ॲसिडिटी किंवा गॅसेसची लक्षणे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, जिवाचा धोका निर्माण होतो; परंतु मनगटातील या उपकरणामुळे ‘ट्रोपोनिन’चे अचूक निदान होऊन ते वाचताही येत असल्याने तातडीने उपचार घेणे शक्य होतील, असेही डॉ. श्रीवास्तव म्हणाले.

Web Title: A wrist watch will now diagnose heart attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.